नवी दिल्ली : आधीची देणी न चुकविल्याने पुण्यासहित सहा विमानतळांवरएअर इंडियाच्या विमानांना इंधन पुरवठा करणे तेल कंपन्यांनी बंद केले आहे. मात्र त्यामुळे एअर इंडियाच्या सेवेवर त्याचा अद्याप फारसा परिणाम झालेला नाही. कोची, पुणे, पाटणा, रांची, विशाखापट्टणम आणि मोहाली या विमानतळांवरून एअर इंडियाल होणारा इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे.
या विमानतळांवरून इंधन मिळणे बंद झाल्याने आता एअर इंडियाच्या विमानांना इतर ठिकाणांहून अतिरिक्त इंधन भरून या विमानतळांवर प्रवास करावा लागणार आहे. त्यातच अतिरिक्त इंधनामुळे विमानाचे वजन वाढणार असल्याने प्रवाशांची संख्या कमी करावी लागणार आहे.
एअर इंडियावर प्रचंड कर्ज असून त्यामुळे ही देणी चुकविणे शक्य झाले नसल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. या कर्जातून बाहेर येण्यासाठी एअर इंडियाला केंद्राने निधी देणे वा या कंपनीचे खासगीकरण करणे हे दोनच उपाय शिल्लक आहेत. मात्र या आर्थिक वर्षात एअर इंडियाची कामगिरी चांगली असून आम्ही नजीकच्या काळात चांगला नफा कमावू,असा दावा प्रवक्त्याने केला.