नवी दिल्ली : चेक-इन बॅगेजवर म्हणजेच प्रवाशांसोबतच्या सामानावर शुल्क आकारण्याचा विचार आशियातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने चालविला आहे. त्यामुळे देशातील विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. ‘इंटरग्लोब एविएशन लिमिटेड’द्वारा संचालित इंडिगो एअरलाइन्सचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, आम्ही यावर सरकारशी चर्चा करीत आहोत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही सर्व परिस्थिती सामान्य करू इच्छितो. विशेष म्हणजे गो एअरलाइन्सनेही तिकिटाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे बॅगेज चार्ज वसूल करण्याची तयारी चालविली आहे. या यादीत सहभागी होणारी इंडिगो ही दुसरी कंपनी ठरणार आहे.
रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांना कोविडपूर्व काळाप्रमाणे १०० टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी सरकारने ऑक्टोबरमध्येच दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मात्र ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी राहणार आहे. आमचा महसूल पूर्ववत होत आहे. आम्हाला सध्या तरी वेगळा निधी उभारण्याची गरज नाही. त्यामुळे संस्थागत गुंतवणूकदारांना समभाग विकून निधी उभारण्याची आमची कोणतीही योजना नाही.