नवी दिल्ली-
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधीच हवाई प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता हवाई प्रवास महागण्याची शक्यात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं विमान इंधनाचा दरही वाढले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी विमान इंधनाच्या दरात (ATF) ८.५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे. त्यानुसार एटीएफच्या दरात ६७४३ रुपये प्रति किलोलीटर वाढ झाली आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार दिल्लीत एटीएफची किंमत ७९,२९४.९१ रुपये प्रति किलोलीटरहून वाढून ८६३०८.१६ रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली आहे. जानेवारी महिन्यात याआधीच दोन वेळा एटीएफच्या किमतीत वाढ झाली होती.
ATF किमतीत मोठी दरवाढ
जानेवारी महिन्यात दोन वेळा एटीएफच्या किमतीत वाढ झाली होती. एक जानेवारी रोजी विमान इंधनाच्या दरात २,०३९.६३ रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच २.७५ टक्के वाढ झाली होती. त्यावेळी विमान इंधनाचा दर ७६,०६२.०४ रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचला होता. तर त्याआधी डिसेंबर महिन्यात दोनवेळा एटीएफच्या दरात घट झाली होती.
नोव्हेंबर महिन्यात विमान इंधनाच्या दराने ८०,८३५.०४ रुपये प्रति किलोलीटर इतका उच्चांक गाठला होता. तर १५ डिसेंबर रोजी एटीएफच्या दरात प्रति किलोलीटर मागे ६,८१२.२५ रुपयांची घट करण्यात आली होती. म्हणजेच जवळपास ८.४ टक्क्यांनी एटीएफच्या दरात घट झाली होती.