Join us

खिशाला कात्री, विमान प्रवास महागणार; IndiGo घेणार एअरलाईन फ्युअल सरचार्ज, तिकिटाची किंमत वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 12:56 PM

यापूर्वी कंपनीनं २०१८ मध्येही इंधन अधिभार लावला होता. पण नंतर तो काढून टाकण्यात आला होता.

इंडिगो एअरलाइन्स आजपासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फ्युअल चार्जेस लागू करणार आहे. यामुळे तुमच्या विमानाच्या तिकिटाच्या किमती सुमारे १००० रुपयांनी महाग होतील. हे शुल्क संबंधित क्षेत्रातील अंतरावर अवलंबून असेल, असं कंपनीनं स्पष्ट केलंय. जेट इंधनाच्या किमतीत वाढ होत असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एअरलाइन्सनं शेवटचा २०१८ मध्ये इंधन अधिभार लावला होता, जो इंधनाच्या किमती कमी झाल्यानंतर हळूहळू काढून टाकण्यात आला होता.वाढत्या एटीएफ किमतींची भरपाई करण्यासाठी इंडिगोनं गुरुवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर इंधन शुल्क लागू केलं. हे शुल्क ते ६ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केलं जाणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. गेल्या तीन महिन्यांत सातत्यानं एव्हिएशन टर्बाइन फ्युअलच्या (एटीएफ) किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एटीएफ हा एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक मोठा भाग बनतो, ज्यामुळे अशा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर अॅडजस्ट करण्याची गरज असल्याचं इंडिगोनं म्हटलंय.किमतीतील बदलानुसार, इंडिगो फ्लाइटचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना सेक्टरच्या अंतराच्या आधारे प्रति सेक्टर फ्युअल चार्ज भरावा लागेल. यापूर्वी, एअरलाइन्सनं शेवटचा इंधन अधिभार २०१८ मध्ये लावला होता. एटीएफच्या किंमती कमी झाल्यानंतर हळूहळू तो बंद करण्यात आलेला.

किती किमीपर्यंत किती दर

  • ५०० किमीपर्यंतच्या अंतरासाठी ३०० रुपये इंधन शुल्क आकारलं जाईल, जे अंतर वाढले की १००० रुपयांपर्यंत वाढेल.
  • ५०१-१००० किमी अंतरासाठी तिकिटावर अतिरिक्त ४०० रुपये आकारले जातील.
  • १००१ ते १५०० किमी अंतरासाठी तिकिट बुक करणार्‍यांना अतिरिक्त ५५० रुपये मोजावे लागतील आणि १५०१-२५०० किमीसाठी ६५० रुपये आकारले जातील.
  • २५०१ ते ३५०० किमी अंतरासाठी ८०० रुपये इंधन शुल्क आकारलं जाईल. ३५०१ किमी पेक्षा जास्त अंतरासाठी १००० रुपये इंधन शुल्क आकारण्यात येईल.
टॅग्स :इंडिगोपैसा