Join us

Airfare : सरकारचा हस्तक्षेप आणि विमान प्रवास झाला स्वस्त, ६१ टक्क्यांपर्यंत कमी झाले तिकिटांचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 1:33 PM

सरकारच्या कठोर भूमिकेनंतर गेल्या २ दिवसांत दिल्ली ते अनेक ठिकाणचे कमाल हवाई भाडं १४ ते ६१ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत हवाई प्रवास महागला होता. देशातील प्रवासापेक्षा देशाबाहेरील प्रवास स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता देशातर्गत हवाई प्रवासाच्या वाढत्या हवाई भाड्यांबाबत सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. आता त्यांना प्रवाशांकडून त्यांच्या मनमर्जीनुसार भाडं आकारता येणार नाही. सरकारच्या कठोर भूमिकेनंतर गेल्या २ दिवसांत दिल्ली ते अनेक ठिकाणचे कमाल हवाई भाडं १४ ते ६१ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून वाजवी भाडं आकारलं पाहिजे. तसंच डीजीसीए आणि मंत्रालय दररोज या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले होते.

सरकारनं विमान कंपन्यांना विशिष्ट मार्गांवर तिकीट दर वाढवण्याचे कारण स्पष्ट करण्यास आणि तिकिटाचे वाजवी दर निश्चित करण्यास सांगितलं आहे. यासोबतच सर्व विमान कंपन्यांना भाडेवाढ थांबवून योग्य दरांसाठी नवीन यंत्रणा तयार करण्यास सांगण्यात आलंय. प्रवाशांना मोठ्या दरवाढीतून दिलासा मिळावा यामुळे सरकारनं हे पाऊल उचललंय.

मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी वाढवले होते दर ३ मे पासून GoFirst ची विमानं रद्द झाल्यानंतर इतर कंपन्यांनी त्यांच्या विमान प्रवासाच्या दरात मोठी वाढ केली. प्रवाशांना प्रवासासाठी २ ते ३ पट अधिक भाडं मोजावं लागत होतं. भाडेवाढ रोखण्यासाठी, सरकारनं विमान कंपन्यांना या मार्गांवरील हवाई भाड्याचे विशेष रुपानं हाय रिझर्व्हेशन बुकिंग डिझायनर क्लास अंतर्गत सेल्फ मॉनिटरिंग करण्याचं आवाहन केलंय. आता डीजीसीए यावर लक्ष ठेवणार आहे.

टॅग्स :ज्योतिरादित्य शिंदे