Join us

हुश्श... विमान प्रवास दर घटले!, ५० टक्क्यांपर्यंत दर कपात; मुंबई ते दिल्ली दहा हजारांत रिटर्न

By मनोज गडनीस | Published: June 18, 2023 6:14 AM

असली तरी आंतरराष्ट्रीय प्रवास दरांच्या किमती मात्र चढ्याच असल्याचे चित्र आहे. वाढत्या विमान प्रवास दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ६ जून रोजी एअरलाईन ॲडव्हायझरी ग्रुपची बैठक घेतली होती.

मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने वाढणारे देशांतर्गत विमान प्रवासाचे दर अखेर आटोक्यात येताना दिसत असून विविध मार्गांवरील विमान प्रवासाच्या दरात १० टक्क्यांपासून तब्बल ५०  टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे. देशांतर्गत विमान प्रवास दरात घट होताना दिसत असली तरी आंतरराष्ट्रीय प्रवास दरांच्या किमती मात्र चढ्याच असल्याचे चित्र आहे. वाढत्या विमान प्रवास दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ६ जून रोजी एअरलाईन ॲडव्हायझरी ग्रुपची बैठक घेतली होती. त्यात विमान कंपन्यांना दर कपात करण्याचे आवाहन केले होते. त्याचे परिणाम आता किमती कमी होण्याच्या रूपाने दिसत आहेत. नागरी विमान महासंचालनालयाकडून (डीजीसीए) प्राप्त माहितीनुसार, देशातील प्रमुख मार्गांवरील विमान प्रवासाच्या दरात १० टक्के ते ५० टक्के कपात झाली आहे. यामध्ये मुंबई ते दिल्ली अशा दुहेरी मार्गावरील प्रवासाने २२ ते २५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामध्ये घसघशीत कपात होत हा प्रवास आता १० हजार रुपयांच्या घरात आला आहे. तर, श्रीनगर हा प्रवास देखील २४ हजारांच्या घरात गेला होता. ते दरही आता १२ हजार रुपयांवर आले आहेत. बंगळुरूचा प्रवास सर्वात स्वस्त झाल्याचे दिसत आहे. मुंबई ते बंगळुरू हा दुहेरी प्रवास आता ५ हजार रुपयांवर आला आहे. तर मुंबई ते चेन्नई हा दुहेरी प्रवास १२ हजार रुपयांवरून ७ हजार रुपये इतका खाली आहे. मुंबई ते कोलकात्याच्या किमतीमध्ये अल्पशी घट झाली असून, या प्रवासासाठी आता विमान कंपन्या १५ हजार रुपयांच्या आसपास दर आकारणी करत आहेत. लेह-लडाखमधील पर्यटनाचा मोसम साधारणपणे जून अखेरीपासून सुरू होतो. मे महिन्यात या प्रवासासाठी ज्यांनी आगाऊ बुकिंग केले त्यांना हे दर २५ हजार रुपयांपर्यंत आकारले गेले होते. मात्र आता हे दर देखील १६ हजार रुपयांच्या घरात आले आहेत. येत्या काही महिन्यांत विविध विमान कंपन्यांच्या ताफ्यात एकूण २५ नवीन विमाने दाखल होणार आहेत. त्यामुळे आणखी दर कपात होईल, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

विमानाच्या दरांनी गाठले हाेते आकाश - गेल्या २ मे रोजी गो-फर्स्ट कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यानंतर कंपनीचे सर्वच व्यवहार थंडावले होते. याचा मोठा फटका विमान प्रवाशांना बसला. कारण ऐन सुट्टीच्या मोसमात देशातील एकूण ७०० विमानांपैकी ५२ विमाने सेवेतून बाद झाली. - गो-फर्स्टच्या ५२ विमानांच्या माध्यमातून दिवसाकाठी ३० हजार प्रवाशांची ने-आण केली जात होती. या सर्वच प्रवाशांना ही सेवा अनुपलब्ध झाल्यामुळे त्यांना अन्य विमान कंपन्यांकडे जावे लागले. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे विमानाच्या दरांनी आकाश गाठले होते.  

टॅग्स :विमानव्यवसाय