लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना किती मद्य द्यायचे याचा निर्णय विमान कंपन्यांनीच घ्यावा, जेणेकरून विमानात होणारे गैरप्रकार टाळता येतील, अशी भूमिका नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) घेतली आहे.
२०२२ मध्ये शंकर मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने विमान प्रवासादरम्यान मद्यधुंद होत एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर लघुशंका केली होती. त्यानंतर विमानातील मद्यसेवनाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर पीडित महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विमानातील मद्यसेवनासंदर्भात विमान कंपन्यांनी नियमावली करावी व अशी सूचना डीजीसीएने विमान कंपन्यांना द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. त्या याचिकेच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र सादर करताना डीजीसीएने ही भूमिका घेतली आहे.
विमानात जर काही गैरप्रकार झाले तर ते हाताळण्यासाठी सध्याच्या घडीला यथोचित कायदे अस्तित्वात असल्याचे डीजीसीएने नमूद केले. सिव्हिल एव्हीएशन रिक्वायरमेंट अंतर्गत नियमावलीनुसार विमान प्रवासात प्रवाशांना किती मद्य द्यायचे याची मुभा विमान कंपन्यांना असल्याचे देखील या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सध्या विमान कंपनींच्या सर्वमान्य धोरणानुसार ज्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचा कालावधी चार तासांपेक्षा कमी आहे, अशा प्रवासात दोन पेग देण्याचे धोरण आहे. मात्र, बिझनेस क्लासच्या प्रवाशांना ते लागू नाही.