मनोज गडनीस ल्ल मुंबईकाळ्यापैशाचा शोध घेण्यासाठी आता जवळपास सर्वच प्रमुख ठिकाणी सरकारने जोरदार नाकेबंदी करण्यास सुरुवात केली असून, विमान तिकिटाची खरेदी करतानाही ‘आधार’ क्रमांक द्यावा लागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याची तयारी सुरू केली आहे. लवकरच नागरी विमान महासंचालनालयाच्या माध्यमातून सर्व विमान कंपन्यांना निर्देश जारी केले जाणार असल्याचे वृत्त आहे. नागरी विमान महासंचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर ज्यांना प्रवास करायचा आहे, अशा प्रवाशांना तिकीट खरेदी करतेवेळी (थेट आॅनलाईन अथवा आॅफलाईन) द्याव्या लागणाऱ्या माहितीमध्ये ‘आधार’क्रमांकही नमूद करावा लागणार आहे. ‘आधार’ क्रमांक हे बँक खात्याशी संलग्न होत असल्यामुळे संबंधित प्रवाशाच्या पैशांचा स्त्रोत समजणे अधिक सुलभ होणार आहे व त्याच दृष्टीने ही यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. आधार कार्डाची जोडणी ही बहुतांश कर विषयक यंत्रणांशीही जोडली गेलेली आहे, त्यामुळे संबंधित प्रवाशांच्या विमान प्रवासाची माहिती कर विषयक यंत्रणांनाही विनासायास मिळेल तसेच, विशेषत: परदेशी जाणाऱ्या प्रवाशांकडेही लक्ष देणे सुलभ होणार आहे. ‘आधार’क्रमांकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तीन वेळा भूमिका स्वच्छपणे स्पष्ट केली असून, ग्राहकांवर या कार्डाचा क्रमांक देण्याची सक्ती करता येणार नाही, असे सांगितले आहे. मात्र तरीही, बँका असोत वा अन्य वित्तीय यंत्रणांर्फे सातत्याने आधार कार्डाची मागणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येताना दिसतात. जर तिकीटाच्या बुकिंगवेळी आधार कार्ड क्रमांक देण्याची सक्ती करण्यात आलीच तर त्यानंतर पुन्हा एक नवा वाद छेडला जाण्याची शक्यता आहे. पॅनकार्डच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक कुंडली तयार करण्याचे काम सरकार करीत आहे.
विमान प्रवासासाठी ‘आधार’सक्ती!
By admin | Published: October 14, 2015 11:16 PM