Airtel Partnerships with blinkit: मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. या दरम्यान टेलिकॉम कंपनी एअरटेलचा शेअर चर्चेत होता. भारती एअरटेलच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी वधारून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. या तेजीमागचे कारण म्हणजे कंपनीनं ब्लिंकिटसोबत मोठा करार केलाय. आता तुम्हाला घरबसल्या फक्त १० मिनिटांत एअरटेलचं सिमकार्ड मिळेल.
एअरटेलचं हे पाऊल विशेषतः अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांना जलद आणि सुलभ मोबाइल कनेक्शन हवंय. लवकरच निवडक शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल आणि त्यानंतर इतर शहरांमध्येही याचा विस्तार केला जाईल, असं कंपनीनं म्हटलंय. दुपारी २.३० च्या सुमारास बीएसईवर कंपनीचा शेअर २.६४ टक्क्यांच्या तेजीसह १,८०२.९० रुपयांवर व्यवहार करत होता.
१६ शहरांमध्ये मिळणार सिमकार्ड डिलिव्हरी
या सुविधेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, सोनीपत, अहमदाबाद, सुरत, चेन्नई, भोपाळ, इंदूर, बंगळुरू, मुंबई, पुणे, लखनौ, जयपूर, कोलकाता आणि हैदराबाद सह १६ प्रमुख शहरांमध्ये सिम डिलिव्हरी उपलब्ध असेल. सिमकार्ड घरपोच मिळवण्यासाठी ग्राहकांना केवळ ४९ रुपये मोजावे लागतील. तसंच सिमकार्ड मिळाल्यानंतर केवायसी केल्यावर सिमकार्ड अॅक्टिव्हेट होईल.
"ग्राहकांचा त्रास आणि वेळ वाचवता यावा म्हणून निवडक शहरांमधील थेट ग्राहकांपर्यंत सिमकार्ड अवघ्या १० मिनिटांत पोहोचवण्यासाठी आम्ही एअरटेल सोबत सहकार्य केलेलं आहे. ब्लिंकिट ग्राहकांपर्यंत सिम पोहोचविण्याची जबाबदारी घेत आहे, तर एअरटेल ग्राहकांना स्वत: केवायसी पूर्ण करण्यास, त्यांचं सिम सक्रिय करण्यास आणि प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन्सपैकी एक निवडण्यास मदत करेल. ग्राहकाला नंबर पोर्टेबिलिटी सुद्धा निवडता येईल आणि हे सर्व त्यांच्या सोयीनुसार केले जाणार आहे," अशी प्रतिक्रिया ब्लिंकिटचे संस्थापक आणि सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी दिली.