मुंबई : व्होडाफोनने जिओबाबत पक्षपात करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारला भारत सोडण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज दुसऱ्या तिमाहीचे आकडे आले असून एअरटेलला 23 हजार कोटी तर व्होडाफोनआयडियाला तब्बल 51 हजार कोटींचा तोटा झाला आहे.
एअरटेलला सर्वोच्च न्यायालयाने थकबाकी देण्याचे आदेश दिल्याचा फटका बसला आहे. यामुळे कंपनीला आजपर्यंतचा सर्वाधिक 23045 कोटींचा तोटा झाला आहे. दुसरी तिमाही 30 सप्टेंबरला संपली. भारती एअरटेलचा महसूल 4.7 टक्क्यांनी वाढला होता. न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
तर व्होडाफोनलाही जबर फटका सोसावा लागला असून 50921 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीला 4947 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा भारताच्या कार्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा तिमाही तोटा आहे.
तिमाही निकालाच्या एक दिवस आधी आदित्य बिर्ला समूहाने सांगितले होते की, जर सरकार समायोजित सकल महसूल 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त देण्यांवर दिलासा दिला नाही तर कंपनीत आणखी गुंतवणूक करणार नाही. असे केल्यास व्होडाफोन आयडिया दिवाळखोरीत जाईल. एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे.