नवी दिल्ली- देशातली सर्वात जुनी खासगी कंपनी असलेली भारती एअरटेल आता परदेशी कंपनी होणार आहे. केंद्र सरकारनं भारती एअरटेलमध्ये प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकी(FDI)ची मर्यादा 49 टक्क्यांनी वाढून 100 टक्के करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीनं शेअर बाजाराला ही माहिती पुरवली आहे. रिझर्व्ह बँकेनं तत्पूर्वी कंपनीतल्या विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार(FPI) किंवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारा(FII)ला फक्त 74 टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी होती. भारती एअरटेलचा व्यवसाय हा जगभरात 18 देशांमध्ये पसरलेला आहे. 24 वर्षांपूर्वी 7 जुलै 1995मध्ये सुनील भारती मित्तल यांनी एअरटेलला दिल्लीतून सुरुवात केली होती.
काय आहे हतबलता?
या मंजुरीनंतर तोट्यात असलेल्या एअरटेलला थकबाकी चुकवणे, नेटवर्कचा विस्तार करणं आणि स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या भरपाईसाठी परदेशी गुंतवणूकदांराकडून रक्कम मिळणार आहे. जिओनं बाजारात पदार्पण केल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. एजीआरच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये सरकारला द्यावे लागत असल्यानं टेलिकॉम कंपन्यांची स्थिती वाईट आहे. अशातच स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कंपनी परदेशी गुंतवणूकदारांची मदत घेऊ शकणार आहे. भारती एअरटेलनं 100 टक्के परदेशी गुंतवणूक(FDI)करण्यास मंजुरी मिळाल्याचं शेअर बाजारालाही कळवलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंपनीनं 35,586 कोटी रुपयांची भरपाई दिली होती. तर 21,682 कोटी रुपये परवाना शुक्ल आणि 13,904.01 कोटी रुपये स्पेक्ट्रमच्या स्वरूपात चुकवावे लागले होते.
भारती टेलिकॉम ही भारती एअरटेलची प्रमोटर कंपनी आहे. भारती एअरटेलमध्ये जवळपास 41 टक्के भागीदारी भारती टेलिकॉमची आहे. यात आता 21.46 टक्के परदेशी गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीत 37 टक्के वाटा हा सामान्य शेअर धारकांचा आहे. भारती टेलिकॉमनं सिंगापूरची सिंगटेल आणि अन्य परदेशी कंपन्यांकडून 4,900 कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. सध्या सुनील भारती मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भारती टेलिकॉममध्ये जवळपास 52 टक्के भागीदारी आहे.
भारती एअरटेल आता होणार परदेशी कंपनी?; 100 टक्के FDIला मंजुरी
देशातली सर्वात जुनी खासगी कंपनी असलेली भारती एअरटेल आता परदेशी कंपनी होणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:06 AM2020-01-22T11:06:12+5:302020-01-22T11:07:19+5:30