Airtel Tariff Hike: रिलायन्स जिओपाठोपाठ आता एअरटेलनेही ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. रिलायन्स जिओच्या पावलावर पाऊल ठेवत भारती एअरटेलनंही आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. आता एअरटेल युजर्सला रिचार्ज प्लान्ससाठी पूर्वीच्या तुलनेत अधिक पैसे खर्च करावे लागतील. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही सेवांच्या टॅरिफ प्लान्समध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
एअरटेलनं त्यांच्या टॅरिफ प्लान्समध्ये १० ते २१ टक्क्यांनी वाढ केली आहे. नव्या प्लाननुसार आता १७९ रुपयांचा प्लॅन १९९ रुपयांना मिळणार आहे. प्रीपेड टॅरिफच्या दरात दररोज सरासरी ७० पैशांपेक्षा कमी वाढ झाली आहे. पोस्टपेड प्लॅनमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता ४४९ रुपयांना मिळणार आहे. वाढीव दर ३ जुलैपासून लागू होतील.
हेही वाचा - जिओनं वाढवलं युझर्सचं टेन्शन! जुलैपासून २५ टक्के वाढणार मोबाईल रिचार्ज; चेक करा डिटेल्स
यापूर्वी रिलायन्स जिओनं आपले रिचार्ज प्लान्स महाग केले होते. कंपनीनं बुधवारी माहिती दिली होती. रिलायन्स जिओच्या रिचार्ज प्लान्समध्ये १५ ते २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. रिलायन्स जिओचे नवे प्लान्स ३ जुलैपासून लागू होणार आहेत.