Airtel 5G Services India : नुकताच देशात स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता दूरसंचार कंपन्यांनी कंबर कसली असून 5G सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा लागल्याचं दिसून येत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेल याच महिन्यापासून देशात 5G सेवांची सुरूवात करणार आहे. तसंच मार्च २०२४ पर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ग्रामीण भागांमध्ये 5G सेवा सुरू करण्याचं ध्येय असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
देशात सध्या मोबाईल सेवांची किंमत अतिशय कमी आहे. तसंच ती वाढवण्याची गरज असल्याचं गोपाल विट्टल म्हणाले. “ऑगस्ट महिन्यापासूनच 5G सेवा सुरू करण्याचं आमचं ध्येय आहे. लवकरच ही सेवा संपूर्ण देशभर पोहोचवली जाईल. मार्च २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक शहर आणि प्रमुख ग्रामीण भागांमध्ये 5G सेवा सुरू होतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातील ५ हजार शहरांमध्ये नेटवर्कची योजना तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी बाब असेल, असंही गोपाल विट्टल म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या स्पेक्ट्रम लिलावात कंपनीनं ३.५ गीगाहर्ट्झ आणि २६ गीगाहर्ट्झ बँडमध्ये १९,८६७.८ मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी मिळवली. कंपनीनं यासाठी ४३,४०० कोटी रूपये खर्च केले. सर्वात महाग असलेल्या आणि उत्तम मानल्या जाणाऱ्या ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये फ्रिक्वेन्सी खरेदीला प्राधान्य देण्यात आलं नाही. या बँडमध्ये अन्य बँडच्या तुलनेत दूरसंचार सेवांसाठी कमी मोबाईल टॉवर्स लावण्याची गरज असल्याचं विट्टल यांनी सांगितलं.
आमच्या स्पर्धक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम बँड स्पेक्ट्रम्स नाहीत. जर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मध्यम बँड स्पेक्ट्रम नसते, तर आम्हाला ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रम घेण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसता असंही त्यांनी स्पष्ट केलं. कंपनीकडे ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँड आहे आणि त्याच्या तुलनेत ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये नेटवर्कनं कोणतंही अतिरिक्त कव्हरेज मिळत नाही. सध्या एअरटेलचा ARPU १८३ रूपये आहे आणि किंमतीत वाढ होण्यासोबतच तो २०० आणि ३०० रूपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.