Join us  

Airtel युझर्सना करावं लागणार किमान १५५ चं रिचार्ज,आणखी ७ सर्कलमध्ये वाढला मिनिमम प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 5:19 PM

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने देशातील आणखी 7 सर्कलमधील प्रीपेड ग्राहकांसाठी आपला किमान मासिक रिचार्ज प्लॅन महाग केला आहे.

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने देशातील आणखी 7 सर्कलमधील प्रीपेड ग्राहकांसाठी आपला किमान मासिक रिचार्ज प्लॅन महाग केला आहे. या सर्कलच्या एअरटेल वापरकर्त्यांना आता दरमहा किमान 155 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. आतापर्यंत कंपनीचा किमान रिचार्ज प्लॅन 99 रुपयांमध्ये उपलब्ध होता. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना मर्यादित टॉक-टाइम देण्यात येत होता. तसंच त्यातून कॉलच्या हिशोबाने पैसे कापले जात होते. त्याची वैधता 28 दिवसांची होती. एअरटेलने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हा प्लॅन टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली आणि आता आणखी सात सर्कल्समध्ये हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

99 रुपयांचा प्लॅन बंद झाल्याने या सर्व सर्कलमधील एअरटेल ग्राहकांना आता किमान 155 रुपयांचा एंट्री-लेव्हल रिचार्ज प्लॅन खरेदी करावा लागेल. त्याची वैधता देखील 28 दिवसांची आहे. परंतु यात आता ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, 1GB इंटरनेट डेटा आणि 300 एसएमएस मिळतील.

"आम्ही ग्राहकांना नेहमीच चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात घेऊन, आम्ही आता मीटर्ड टॅरिफ बंद केले आहेत आणि त्याऐवजी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 1GB डेटा आणि 300 SMS सह 155 रुपयांच्या प्लॅनने हा प्लॅन बदललाय. युझर्स आता कोणत्याही अडथळ्याशिवाय या प्लॅनमध्ये प्रवेश करू शकतात. आम्हाला खात्री आहे की हा अधिक सुविधा आणि उत्तम मूल्य असलेली प्लॅन सिद्ध होईल,” असे एअरटेलने एका निवेदनाद्वारे म्हटलेय.

 

टॅग्स :एअरटेल