Join us

एअरटेलची फोर-जी सेवा २९६ शहरांत

By admin | Published: August 06, 2015 10:30 PM

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने गुरुवारी देशातील २९६ शहरांमध्ये फोर-जी नेटवर्कची सेवा उपलब्ध केली. ही सेवा उपलब्ध करायच्या आधी काही मोजक्या

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने गुरुवारी देशातील २९६ शहरांमध्ये फोर-जी नेटवर्कची सेवा उपलब्ध केली. ही सेवा उपलब्ध करायच्या आधी काही मोजक्या शहरांत कंपनीने पाहणी केली होती. याआधी एअरटेलने २०१२ मध्ये देशात पहिल्यांदा कोलकात्यात फोर-जी सेवा उपलब्ध केली होती.एअरटेलने निवेदनात म्हटले आहे की, ‘ग्राहक आता एअरटेल फोर-जीवर उच्च गतीच्या वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा वापर करू शकतील व हाय डेन्सिटी व्हिडिओ, वेगाने अपलोडिंग आणि चित्रपट, संगीत आणि छायाचित्रे डाऊनलोड सेवेचा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपयोग करू शकतील.’ एअरटेल फोर-जी सेवा मोबाईल फोन, डोंगल, फोर-जी हॉटस्पॉट, वायफाय डोंगलसह वेगवेगळ्या प्रकारच्या स्मार्ट उपकरणांवर उपलब्ध असेल.या सेवेची घोषणा करताना भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाळ विठ्ठल म्हणाले की, उच्च गतीची मोबाईल ब्रॉडबँड सेवा खऱ्या अर्थाने उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही भारतातील पहिले व्यावसायिक फोर-जी नेटवर्क तयार केले. आज राष्ट्रीय पातळीवर ही सेवा उपलब्ध होणे आमच्या प्रवासातील एक छोटेसे पाऊल आहे. एअरटेलने नवे अ‍ॅप ‘विंक मुव्हीज’ सादर करण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली. या अ‍ॅप्लिकेशनमुळे हजारो चित्रपट आणि लोकप्रिय व्हिडिओज बघता येणार आहेत.