नागपूर : औषधांच्या उत्पादनातील आघाडीची अजंता फार्मा कंपनी यावर्षीच्या अखेरीस कृषी कचऱ्यापासून जैव-इंधनात रुपांतर करणारे ‘एन्झाईम’ बाजार आणणार असल्याची माहिती अजंता फार्माचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी येथे दिली.
अग्रवाल यांनी शनिवारी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी लोकमत मीडिया समूहाच्या वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्यासमवेत त्यांचे लहान भाऊ आणि कंपनीचे उपाध्यक्ष मधुसूदन अग्रवाल होते.
अग्रवाल म्हणाले, प्रत्येक पिकाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेती कचरा तयार होतो आणि पर्यायी वापर न झाल्यास शेतकरी ही प्रचंड संपत्ती जाळून टाकतात. अजंता फार्माने या कृषी कचºयापासून एन्झाईम तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरिता आपल्या संशोधन आणि विकास केंद्रात प्रयोग सुरू केला आहे.
अग्रवाल मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहेत. सन १९७३ मध्ये ते औरंगाबादला आले आणि केवळ १० हजारांच्या भांडवलात एरंडेल तेल, निलगिरी तेल आदी मेडिसीनचे रिपॅकिंग सुरू केले. सन १९७९ मध्ये पिंकू ग्राईप वॉटर नावाने ग्राईप वॉटर विकसित केले.
गुलाबी रंगाच्या आवरणात ग्राईप वॉटर सादर केले. आक्रमक विपणनामुळे पिंकू ग्राईप वॉटर अवघ्या तीन वर्षांत मार्केट लीडर बनले. त्यानंतर आम्हाला मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही, असे अग्रवाल म्हणाले.
अग्रवाल म्हणाले, सध्या जेनेरिक औषधांसह १५० पेक्षा जास्त प्रकारच्या औषधांची निर्मिती आणि सूत्रीकरण करतो. ही उत्पादने जगातील आफ्रिकन देश आणि अमेरिकेसह जगातील १४० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करतो. आमचे औरंगाबाद, दहेज, पैठण आणि गुवाहाटी येथे चार उत्पादन प्रकल्प असून मॉरिशसमध्ये अमेरिकेला निर्यातीसाठी एक प्रकल्प आहे. अजंता फार्माचे ७५०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आणि १० हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल आहे, असेही त्यांनी सांगितले.
अग्रवाल यांनी नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागातून बी.फार्म. पदवी घेतली आहे. आम्ही फार्मसी विभागाची जागतिक स्तरावर नव्याने सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अजंता फार्मा १२ कोटी रुपये खर्च करणार आहे.
गुरुदक्षिणा देण्याचा हा आमचा मानस असल्याचे अग्रवाल म्हणाले. अग्रवाल बंधूंनी समता फाऊंडेशनची स्थापना केली आणि त्याद्वारे निराधार व गरजू मुलांना व लोकांसाठी अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अजंता फार्मा ‘एन्झाईम’ बाजारात आणणार - पुरुषोत्तम अग्रवाल
औषधांच्या उत्पादनातील आघाडीची अजंता फार्मा कंपनी यावर्षीच्या अखेरीस कृषी कचऱ्यापासून जैव-इंधनात रुपांतर करणारे ‘एन्झाईम’ बाजार आणणार असल्याची माहिती अजंता फार्माचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी येथे दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:32 AM2019-08-12T05:32:37+5:302019-08-12T05:32:58+5:30