Join us

भारतीय वंशाचे अजय बंगा जगाला वाटणार कर्जे; जागतिक बॅंकेवर निवडीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 9:53 AM

जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली.

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती अजय बंगा हे जागतिक बँकेवर बिनविरोध निवडून जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे. या पदासाठी केवळ बंगा यांचेच नाव पुढे आल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.त्यांच्या औपचारिक नियुक्तीपूर्वी, बंगा यांची बँकेच्या संचालक मंडळाकडून मुलाखत घेतली जाईल. बँकेने अद्याप मुलाखतीची वेळ जाहीर केलेली नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले होते की, ‘इतिहासातील या गंभीर क्षणी’ जागतिक संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिका अजय बंगा यांना जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नामांकित करीत आहे. जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली. यादरम्यान ६३ वर्षीय बंगा यांना आव्हान देण्यासाठी जगभरातून एकाही व्यक्तीने अर्ज केलेला नाही.

बँकेने काय म्हटले? 

जागतिक बँकेने म्हटले की, बोर्डाला एक नामांकन मिळाले आहे. आम्ही हे जाहीर करू इच्छितो की, या पदासाठी अमेरिकन नागरिक अजय बंगा यांच्या नावाचा विचार केला जाईल. बंगा यांच्याशिवाय अन्य कोणाचाही या पदासाठी अर्ज आलेला नाही. 

नियुक्ती कधी? 

मे महिन्याच्या सुरुवातीला जागतिक बँकेच्या नव्या प्रमुखांची नियुक्ती होईल, असे मानले जात आहे.

इतिहास घडणार...

मास्टरकार्डचे माजी प्रमुख बंगा सध्या अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात. २०१६ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले होते. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने, बंगा हे जगातील २ सर्वोच्च वित्तीय संस्थांचे प्रमुख होणारे पहिले भारतीय-अमेरिकन व अमेरिकन-शीख बनतील. त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

टॅग्स :वर्ल्ड बँकभारत