दिव्यांग व्यक्तींपासून अनेकदा आपल्याला प्रेरणा मिळते. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. अजय गुप्ता यांना लहानपणी पोलिओ झाला. याचा त्यांच्या दोन्ही पायांवर परिणाम झाला आणि ते व्हीलचेअरवर आले. पण त्यांनी हार मानली नाही. अजय गुप्ता यांनी व्हीलचेअरवर असताना तब्बल १०० कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. आज ते "बचपन प्ले स्कूल" चे संस्थापक आहेत, १२०० हून अधिक शाळांची फ्रँचायझी चेन आहे.
दिल्लीत राहणारे अजय गुप्ता यांना लहानपणी पोलिओ झाला. पोलिओमुळे त्यांच्या दोन्ही पायांवर परिणाम झाला आणि ते व्हीलचेअरवर आले. अजय यांच्या आजोबांचं मिठाईचे दुकान होतं. अजय त्यांचा जास्तीत जास्त वेळ तिथेच घालवायचे. अजय यांच्या आजोबांना एका शिक्षकाने अजय यांना शाळेत पाठवण्याची प्रेरणा दिली. त्यांना शाळेत पाठवणं हे त्यांच्या घरच्यांसाठी खूप अवघड होतं, पण कुटुंबीयांनी शाळेत पाठवून त्यांना शिक्षण दिलं.
शाळेत जाण्यासोबतच अजय यांनी आजोबांचं मिठाईचं दुकानही सांभाळलं. दुकानात आपल्या वडिलांनाही साथ दिली. हळूहळू अजय मोठे होऊ लागले तेव्हा अजय यांच्या घरच्यांना त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली. अजय यांनी त्याच्या पसंतीच्या मुलीशी म्हणजेच दीपशिखा यांच्याशी लग्न केलं. दीपशिखा त्यांच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठ्या आहेत.
अजय यांच्या लग्नानंतर त्यांची पत्नी दीपशिखा यांनी त्यांना खूप साथ दिली. अजय यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या होत्या. अजय यांच्या लक्षात आलं की, लहान मुलांसाठी आकर्षक आणि प्रभावी शैक्षणिक कार्यक्रमांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत अजय यांनी या संकल्पनेवर काम करायला सुरुवात केली आणि एक इनोव्हेटीव्ह प्ले स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला.
२००४ मध्ये अजय गुप्ता यांनी हरियाणाच्या हिसारमध्ये आपलं पहिलं बचपन प्ले स्कूल सुरू केलं. या शाळेत मुलं खेळता खेळता अनेक नवनवीन गोष्टी शिकतात. तसंच वातावरण असतं. अजय यांच्या मेहनतीमुळे हळूहळू शाळेची लोकप्रियता वाढली आणि हे काम पुढे वाढत गेलं. आज पूर्ण भारतात यांच्या अनेक ठिकाणी फ्रँचायझी आहेत. अजय गुप्ता यांच्या या शाळेने १०० कोटींचा यशस्वी व्यवसाय केला आहे.