आकासा एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विनय दुबे यांनी एअरलाइनच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्वास व्यक्त केला. एअरलाइन्सकडे आवश्यक ते भांडवल आहे. या वर्षाच्या अखेरीस तीन अंकी (किमान १००) विमानांसाठी ऑर्डर देण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध आहे, अशी माहिती दुबे यांनी दिली.
एअरलाइनमध्ये अधिक वेगाने वाढ करण्याची क्षमता आहे. अकासा एअर पुढील महिन्यात आपल्या ऑपरेशन्सना एक वर्ष पूर्ण करत असल्याचे दुबे म्हणाले. "आम्ही आमच्या अपेक्षेनुसार गोष्टी साध्य केल्या आहेत. सध्या, एअरलाइनकडे १९ विमानं आहेत आणि २० वं विमान या महिन्यात त्यांच्या ताफ्यात सामील होऊ शकतं. कंपनी लवकरच आंतरराष्ट्रीय कामकाज सुरू करण्यासाठी सज्ज असल्याचंही ते म्हणाले.
"'मला वाटतं की आमच्याकडे पुरेसा निधी आहे. आमच्याकडे ७२ विमानं आणि चार अतिरिक्त विमानांसाठी ऑर्डर देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे. तसंच या वर्षाच्या अखेरीस तीन अंकी संख्येत विमानांची ऑर्डर देण्यासाठी पुरेसे भांडवल असेल," असं दुबे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं.
२००० हजार विमानं ताफ्यात येणार
अधिकृत आकडेवारीनुसार, मे महिन्यात अकासा एअरचा देशांतर्गत बाजारातील हिस्सा ४.८ टक्के होता. पुढील २० वर्षे विमान उड्डाणासाठी सुवर्णयुग असणार आहेत आणि येत्या १५ ते २० वर्षांत देशात सुमारे २ हजार विमानं आणि आणखी विमानतळं असतील, असं त्यांनी नमूद केलं.
आम्ही ज्या स्तरावर आहोत त्या स्तरावर आम्ही खूप आनंदी आहोत. चांगल्या प्रमाणात वाढ झाली आहे. जेव्हा विमान कंपनीच्या ताफ्यात २० विमानं असतील तेव्हा कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करू शकते, असंही दुबे यांनी नमूद केलं.