मुंबई : गेल्या वर्षी मुंबईतून सुरू झालेल्या अकासा एअरलाइन्स या कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी नागरी विमान मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून, लवकरच कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुरुवात करणार आहे.
या उड्डाणांसाठी कंपनीने नागरी विमान मंत्रालयाकडे अर्ज केला होता. त्यानंतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नागरी विमान महासंचालनालयासोबत चर्चा करून कंपनीचा हा प्रस्ताव मान्य केला आहे. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात पाच वर्षे उड्डाणाचा अनुभव व कंपनीच्या ताफ्यात २० विमाने असल्यास संबंधित कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणाची अनुमती देण्याचा नियम होता. मात्र, अलीकडेच या नियमात बदल करण्यात आला असून, त्यातून पाच वर्षांच्या उड्डाणाची अट वगळण्यात आली आहे.
अकासा विमान कंपनीच्या ताफ्यात २० वे विमान नुकतेच दाखल झाले आहे. त्यामुळे या सुधारित नियमाच्या आधारे कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणाची मंजुरी मिळाली आहे. २०२३ च्या अखेरीपर्यंत कंपनीचे पहिले विमान आंतरराष्ट्रीय पातळीवर उड्डाण करेल, असा विश्वास
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, पायलटची गळती एकीकडे कंपनीला आंतरराष्ट्रीय विमानासाठी मंजुरी मिळाली असली तरी कंपनीमधून सुमारे ४३ वैमानिकांनी अचानक नोकरी सोडून दुसऱ्या विमान कंपनीत नोकरी स्वीकारली आहे.