रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांनी आपला मोठा भाऊ आणि बहिण यांच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला. आपण त्यांना आपले स्पर्धक मानत नाही, असं ते म्हणाले. आकाश आपल्यासाठी प्रभू श्रीरामाप्रमाणे आणि आणि बहिण ईशा कायमच आपल्याला आईप्रमाणे सांभाळून घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी आपल्या भावा-बहिणीसोबतच्या नात्याबाबत मनमोकळेपणानं गप्पा मारल्या.
आकाश आणि ईशा अंबानी यांच्यासोबत असलेल्या आपल्या बाँडिंगबाबत अनंत अंबानी यांनी आपण त्यांना आपला गुरू मानत असल्याचं म्हटलं. इंडिया टुडेच्या 'जब वी मेट' या कार्यक्रमात अनंत अंबानी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. ते माझ्या सल्लागाराप्रमाणे आहेत. मी स्वत: हनुमानाप्रमाणे म्हणू शकतो. मी आयुष्यभर त्यांच्या सल्ल्याचं पालन करेन, असं ते म्हणाले.
मागील पिढीच्या वादावर काय म्हणाले?
अनंत अंबानी यांनी यापूर्वीच्या पिढीतील (मुकेश अंबानी, अनिल अंबानी) यांच्यातील मतभेदांवरही प्रतिक्रिया दिली. "मला अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. कारण आम्हा भावा-बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. दोघंही माझ्यापेक्षा मोठे आहेत आहे. मी हनुमानाप्रमाणे आहे आणि माझा भाऊ माझ्यासाठी प्रभू श्रीरामांसारखा आहे आणि माझी बहिण आईप्रमाणे आहे. त्यांनी कायमच मला सहकार्य केलंय. आमच्यात कोणतेही मतभेद किंवा स्पर्धा नाही. आम्ही फेविक्विकप्रमाणेच एकत्र जोडलेले आहोत," असं अनंत अंबानी म्हणाले.
धीरुभाई अंबानींशी तुलनेवर काय म्हणाले?
अनंत अंबानी यांनी आपले आजोबा धीरुभाई अंबानी यांच्याशी तुलनेवरही उत्तर दिलं. "ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु मी तिथपर्यंत पोहोचलोय असं मला बिलकूल वाटत नाही. मी फक्त माझ्या आजोबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
अंबानी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबात काही दबाव आहे का याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं ते म्हणाले. जी देवाची इच्छा असेल ते होईल. मी केवळ माझ्या वडिलांच्या दृष्टीकोनाचं पालन केलंय. यामुळे मला पुढे जाण्यास मदत मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.
वडिल आपल्या मित्राप्रमाणेच
अनंत अंबानी यांनी आपल्या वडिलांबाबत बोलताना ते कठोर वडिलांप्रमाणे नाही, तर एका मित्राप्रमाणे असल्याचं म्हटलं. त्यांच्याप्रती मनात आदराची भावना आहे. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला इतकं काही करता आलं, असं अनंत अंबानी म्हणाले.