अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. या दोन्ही सणाला सोने खरेदीला खास महत्व आहे. पण या दिवशी सोने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. यावेळी हॉलमार्क पाहून सोने खरेदी केलेलेच बरे.
सोने खरेदी करताना खालील बाबींची काळजी घ्या-
१) हॉलमार्क सर्वात पहिल्यांदा तपासा
सोने खरेदी करताना सावध असले पाहिजे. तसेच सोने खरेदी करताना प्रथम बीआयएस हॉलमार्क पाहिला पाहिजे. हॉलमार्कद्वारे खरे सोने ओळखण्यास मदत होते. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचा त्रिकोणी निशान असतं. आणि त्याच्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धता लिहिलेली असते.
२) खोटे दागिने कसे ओळखावे?
सोने खरे आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी अॅसिड टेस्ट करणे अधिक फायद्याचे आहे. तुम्ही एखाद्या पिनच्या सहाय्याने सोन्यावर ओरखडा ओढा. त्यानंतर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाका. बनावट सोने तात्काळ हिरवे होईल. मात्र, शुद्ध सोन्यावर काहीही परिणाम होणार नाही.
३) चुंबकाने तपासा सोने
शुद्ध सोने पाहण्यासाठी चुंबकही महत्वाची भूमिका बजावते. शुद्ध सोने चुंबकाला चिकटत नाही. मात्र, जरा तरी सोने चुंबकाकडे आकर्षित झाले तर काहीतरी गडबड आहे, असे समजा. सोन्यात भेसळ झाल्याचे ते एक लक्षण आहे. त्यामुळे शुद्ध सोने तात्काळ समजते. सोने खरेदी करताना सोबत चुंबक घेऊन जावे.
४) पाण्याच्या मदतीने देखील तपासू शकता सोने
पाण्याच्या माध्यमातून शुद्ध सोनेबाबत खात्री करु शकता. शुद्ध सोने पाहण्यासाठी एका कपमध्ये पाणी घ्या. त्यात सोने बुडवा. जर सोने कपाच्या तळाशी राहिले तर ते सोने शुद्ध आहे. सोने तरंगत असेल तर ते नकली आहे, हे समजा. सोने कधीही तरंगत नाही, ते पाण्यात बुडतं.
५) २२ कॅरेट आणि २४ कॅरेट
शुद्ध सोने 24 कॅरेटचं असतं. पण 24 कॅरेटचे दागिने तयार होत नाहीत. दागिने तयार करण्यासाठी 22 किंवा 18 कॅरेट सोने वापरले जाते. आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी असते. त्यामुळे ज्वेलर्सकडून तसे बिलात लिहून घ्या.