नवी दिल्ली : प्रस्तावित जीएसटी रचनेतहत मद्य आणि तंबाखू यासारख्या नुकसानकारक वस्तू बनविणाऱ्या उद्योगांना ‘अनिष्ट कराच्या’ (सिन कर) स्वरूपात अतिरिक्त कर भरावा लागेल.देशभरात समान कर लागू करणारी जीएसटी ही कररचना आहे. वित्त मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मद्य, तंबाखू यासारख्या उद्योगांसाठी आम्ही अतिरिक्त कर लावण्याची शिफारस केली आहे. मात्र, जीएसटी व्यवस्थेत कोणत्या दराने हा कर लागेल हे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले नाही.सामाजिक दृष्टीने हानिकारक आणि आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायक असणाऱ्या वस्तूंवर ‘अनिष्ट कर’ लावला जातो. त्यात मद्य आणि सिगारेट यासारख्या वस्तूंचा समावेश होतो. जागतिक स्तरावर ‘अनिष्ट करा’ची व्यवस्था आहे. त्यानुसार मद्य आणि तंबाखूशी निगडित उत्पादनांवर अधिक कर लावला जातो. या वस्तूंचा लोकांनी कमी वापर करावा, हा त्यामागचा हेतू आहे.याशिवाय या उत्पादनांवर अधिक कर लादून महसूल वाढविणे हाही त्यामागचा एक स्पष्ट उद्देश आहे. कारण या वस्तूंचे सेवन करणारे लोक अशा कराचा सर्वसाधारणपणे विरोध करीत नाहीत. त्यामुळे या वस्तूंचे सेवन करणाऱ्या लोकांवरच या कराचा परिणाम होतो.वित्त मंत्रालय सध्या उद्योग आणि अन्य संबंधित घटकांकडून जीएसटी कायद्याबाबत त्यांची मते अजमावत आहे. हा अधिकारी म्हणाला की, प्रत्येकालाच चर्चा करण्याची संधी दिली जात आहे. त्यातून त्यांचे मत अजमावण्यात येत आहे. या करात कोणत्या त्रुटी आढळल्या तर आम्ही त्यावर निश्चित विचार करू. अजून काहीही निश्चित ठरलेले नाही. हे सर्व केवळ प्रस्ताव आहेत.
मद्य, तंबाखू उद्योगांना द्यावा लागणार ‘अनिष्ट कर’
By admin | Published: October 25, 2015 10:37 PM