शेअर मार्केटमध्येगुंतवणूक करणाऱ्यांना मार्केटमधील नवीन बदलांची माहिती असली पाहिजे. कारण नवीन तंत्रज्ञानासह येणारे बदल फायद्याचे असतात तसेच काही प्रमाणात तोट्याचेही असतात. सध्या बाजारात अल्गो ट्रेडिंगची (Algo Trading) बरीच चर्चा आहे. सोशल मीडियावर अल्गो ट्रेडिंगद्वारे खात्रीशीर परतावा मिळू शकतो असा दावा करणाऱ्या अनेक जाहिराती दिसतात. नेमकं हे अल्गो ट्रेडींग काय आहे? गुंतवणुकदारांना त्याचा कितपत फायदा होतो? तसेच याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
भारतात अल्गो ट्रेडींगची सुरूवात २००८ मध्ये सुरू झाली. खूपच कमी लोक याचा सुरूवातीला उपयोग करत होते. गेल्या पाच वर्षांपासून रिटेल ट्रेडर्सनी अडवान्स्ड अल्गो ट्रेडींगचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. झेरोधाचे (zerodha algo trading) सहसंस्थापक नितीन कामत (nitin kamat) यांना अल्गो ट्रेडिंगबद्दल वेगळं मत व्यक्त केलंय. कामत यांनी सांगितले की, अल्गो ट्रेडिंग खात्रीपूर्वक परतावा देते हा गैरसमज आहे.
काही दिवसांपूर्वी देशातील शेअर मार्केट नियामक संस्था असणाऱ्या सेबीने (SEBI) अल्गो ट्रेडींगसंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावर बोलताना झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी सांगितले की, SEBI ने नियमन नसलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे (unregulated trading platforms) ट्रेडींगसाठी अल्गोरिदमिक धोरणे ऑफर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कामत यांचा विश्वास आहे की या नवीन बदलांमुळे अल्गोरिदमिक ट्रेडिंगमध्ये असलेल्या त्रुटी दूर झाल्या आहेत.
SEBI ने अल्गो ट्रेंडींगविषयी काय सूचना केल्या आहेत?
सेबीने एक परिपत्रक जारी करत सांगितले होते की, अल्गो ट्रेडिंग सेवा प्रदान करणार्या स्टॉक ब्रोकर्सनी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, भूतकाळात मिळालेल्या परताव्याचा किंवा भविष्यात प्राप्त होणार्या अपेक्षित परताव्याचा किंवा अल्गोरिदमच्या कामगिरीचा कोणताही संदर्भ देऊ नये. अल्गो ट्रेडिंग हे एक तंत्र आहे, जे काही नियमांनुसार आपोआप ट्रेडींग करते. सध्या मार्केटमध्ये अशा सेवा देणार्या काही कंपन्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सेबीने गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन असे निर्देश जारी केले आहेत.
अल्गो ट्रेडिंगमधून उच्च परतावा मिळण्याचा दावा करणाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या धोरणांना (algo trading strategies) रेटिंगही दिली आहे. अशा प्रकारची रेटिंग पाहून सामान्य गुंतवणूकदारांचा या ब्रोकरवर किंवा कंपनीवर सहज विश्वास बसू शकतो आणि भविष्यात त्यांना याबद्दल आर्थिक नुकसानाला सामोरेही जावं लागू शकतं. ही एक प्रकारची फसवी स्ट्रॅटेजी आहे. यामुळेच सेबीने नवीन नियम करत यांना आळा घालण्याचा प्रयत्न केलाय.
अल्गो ट्रेडींगबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत अल्गो ट्रेडींगबद्दल ट्विटरवर लिहते झाले आहेत. ते म्हणतात की, बाजारातील अन रेग्युलेटेड प्लॅटफॉर्म ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅक-टेस्टिंगद्वारे असाधारण परताव्याचे अमिष दाखवत होते त्यामुळेच सेबीनी हे नवीन बदल केले आहेत. ते पुढे म्हणाले, “अल्गो ट्रेडिंगमुळे हमखास परतावा मिळतो असा गैरसमज आहे. फायदा होण्यासाठी ट्रेडींगचे ठोकताळे शोधणे तसे कठीण नाही. जेंव्हा तुम्ही गुंतलेल्या खर्चाचा हिशोब केला तर जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये, उच्च परतावा झपाट्याने घसरतो किंवा परतावा दिसून येत नाही.
SEBI last week published a circular asking brokers not to associate directly or indirectly with algo trading platforms that claim historical returns on strategies.
— Nithin Kamath (@Nithin0dha) September 6, 2022
We want to reiterate that we don't have any such partnerships. 1/7https://t.co/pxhLCDtuD4
अल्गोरिदमद्वारे भूतकाळात किंवा भविष्यात संभाव्य परतावा देण्याचे आमिष दाखवले आहे, सेबीने अशा प्लॅटफॉर्मशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या स्टॉक ब्रोकर्सवर बंदी घातली आहे. सेबीने असा कोणताही दावा त्यांच्या प्लॅटफॉर्म किंवा वेबसाइटवरून काढून टाकण्याचे निर्देशही दिले होते.