मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या प्रबंध संचालक व सीईओ चंदा कोचर यांना निर्दोष मानून पाठिंबा दर्शविला आहे. आयसीआयसीआय बँकेने तसे पत्रक काढले आहे. चंदा कोचर यांच्यावर व्हिडिओकॉन समूहाच्या पाच कंपन्यांना ३,२५० कोटी कर्ज देण्यासाठी व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याशी साटेलोटे केल्याचे वृत्त पसरल्यानंतर बँकेने हा खुलासा केला.कोचर यांचे पती दीपक यांनी २००८ साली धूत यांच्या भागीदारीत न्यूपॉवर रिन्युएबल्स प्रा.लि. ही कंपनी सुरू केली होती. २००९ साली धूत यांनी संचालकपदाचा राजीनामा देऊन भांडवल २.५० लाखात दीपक यांना विकले. मार्च २०१० मध्ये धूत कुटुंबाच्या सुप्रीम एनर्जीने न्यूपॉवरला ६४ कोटी कर्ज दिले. ते कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या रूपात होते.धूत व कोचर कुटुंबामध्ये २००९ ते २०१० च्या मध्यापर्यंत आर्थिक व्यवहार होऊन सुप्रीम एनर्जीकडे न्यूपॉवरचे ९५ टक्के भांडवल आले. २०१० मध्ये धूत कुटुंबीयांनी सुप्रीम एनर्जीमधील सर्व भांडवल महेशचंद्र पुंगलिया यांना दिले. पुंगलियांनी सुप्रीम एनर्जीमधील सर्व भांडवल पिनॅकल एनर्जी ट्रस्टकडे हस्तांतरित केले. दीपक कोचर हे पिनॅकलचे मुख्य ट्रस्टी आहेत.थोडक्यात, धूत यांच्या सुप्रीम एनर्जीने कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्युएबल्सला ६४ कोटी कर्ज दिले, ते भांडवलात परिवर्तित केले व तीन वर्षांत या भांडवलाचे मालकी हक्क कोचर यांना दिले. हे व्यवहार सेबी व स्टॉक एक्सचेंजच्या नियमानुसार व कंपनी कायद्यानुसार झाले आहेत. एका कंपनीने दिलेले कर्ज परत न घेता त्या कंपनीलाच भांडवल म्हणून परिवर्तित करून दिल्याने प्रकरण संशयास्पद झाले.बँकेने २०१२ साली व्हिडिओकॉनच्या पाच कंपन्यांना एकूण ३,२५० कोटी कर्ज दिले. त्याच्याशी हे प्रकरण जोडले जात आहे. त्यापैकी २,८१० कोटी थकीत आहे. बँकेने म्हटले आहे की, व्हिडिओकॉनने एकूण ४०,००० कोटी कर्ज मागितले होतं. त्याला २० बँकांच्या समूहाने मंजुरी दिली. यात कोचर यांनी धूत यांच्याशी साटेलोटे करण्याचा प्रश्नच नाही. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या खुलाशात धूत यांनी म्हटले की, न्यूपॉवर व सुप्रीम एनर्जी या कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन भांडवलही मूळ किमतीत विकले. या कंपन्यांपासून आपण पूर्णत: विभक्त झालो आहोत.
आयसीआयसीआय बँकेच्या सर्व संचालकांचा चंदा कोचरना पाठिंबा,पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 5:22 AM