नवी दिल्ली - सरकारी देवाण घेवाण करणाऱ्या सर्व सरकारी बँकांच्या शाखा येत्या रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील आदेश सर्व संबंधित बँकांना दिले आहेत. 31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. मात्र त्या दिवशी रविवार येत असल्याने सरकारी देवाण घेवाण करणाऱ्या बँकांना आपल्या शाखा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत आरबीआयने एक पत्रक जारी केले आहे. ''सरकारी देवाण घेवाणीसाठी 31 मार्च 2019 रोजी सरकारचे सर्व पे अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे सर्व एजन्सी बँकांनी सरकारी व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या शाखा रविवार, 31 मार्च 2019 रोजी सुरू ठेवाव्यात,'' असे रिझर्व्ह बँकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार 30 मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि 31 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. तसेच RTGS आणि NEFT सह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक देवाण घेवाणीचे व्यवहारसुद्धा 30 आणि 31 मार्च रोजी अतिरिक्त वेळेपर्यंत सुरू राहतील, असेही रिझर्व्ह बँकेच्या या पत्रकात म्हटले आहे.
येत्या रविवारी सर्व सरकारी बँका सुरू राहणार, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 9:00 AM