Join us

सर्व सरकारी सेवा देणार स्मार्टफोनवर

By admin | Published: September 22, 2016 4:06 AM

सर्व सरकारी सेवा स्मार्टफोनवर आणण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करीत आहे

मुंबई : सर्व सरकारी सेवा स्मार्टफोनवर आणण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करीत आहे. राज्याला डिजिटल करण्याच्या मोहिमेचा हा भाग असून, येत्या काही वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित ओरॅकल ओपन वर्ल्ड कॉन्क्लेव्हमधील आपल्या बीज भाषणाचे काही अंश मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात ही माहिती त्यांनी दिली. फडणवीस यांनी म्हटले की, सरकारी सेवा योग्य दरांत आणि योग्य वेळांत नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या स्मार्टफोनवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्याला पूर्ण डिजिटल करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. डिसेंबर २0१८ पर्यंत आम्ही राज्यातील सर्व खेडी डिजिटल करणार आहोत. शिक्षण आणि आणि आरोग्य सेवा क्षेत्रांत संपूर्ण बदल करण्याची आमची योजना आहे. आम्हाला शहरांचा चेहरा मोहराही बदलायचा आहे. कारण आता शहरे आणि ग्रामीण भागात जवळपास समसमान लोकसंख्या राहते. फडणवीस म्हणाले की, आमची लोकसंख्या मनुष्यबळामध्ये रुपांतरीत करण्याची गरज आहे. गती आणि प्रमाण हेही महत्त्त्वाचे आहे. मी येथे उत्तरे शोधण्यासाठी आलो आहे. २0२0 पर्यंत आम्हाला सरकारी प्रक्रिया आॅटो पायलट मोडवर ठेवायच्या आहेत. किमान पारदर्शकता आणि कार्यक्षमता प्राप्त करायची आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय आहे. कुठल्याही बदलासाठी राजकीय नेतृत्व संकल्पना तयार करते आणि तंत्रज्ञ ती प्रत्यक्षात आणतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मुंबईत एक्सलन्स सेंटरमहाराष्ट्र सरकार आणि ओरॅकल यांनी राज्याला डिजिटल करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, राज्याचा स्मार्ट सिटी प्रकल्प दोघे मिळून विकसित करणार आहेत. त्यासाठी दोघे मिळून मुंबईत सेंटर आॅफ एक्सलन्सची स्थापना करणार आहेत. या केंद्रात सरकारला उपयोगी ठरेल अशा तंत्रज्ञानाचा विकास आणि परीक्षण केले जाईल. या केंद्रासाठी सरकार आणि कंपनी दोघेही गुंतवणूक करतील.