प्रसाद गो. जोशी
कोरोनावरील लस लवकरच येण्याच्या बातमीने जगभरातील गुंतवणूकदार उत्साही असून, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. याचा फायदा शेअर बाजारातील सर्वच निर्देशांकांना मिळाला असून, त्यांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. गतसप्ताहात सेन्सेक्स, निफ्टी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकानी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. बाजारात सर्वत्र तेजीचा बैल उधळत आहे. धातू, दूरसंचार या निर्देशांकांचा अपवाद वगळता सर्वच निर्देशांक वाढले.
शेअर बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता सर्वच दिवशी वाढ झाली. सप्ताहात सेन्सेक्स (४८,८५४.३४), निफ्टी(१४,३६७.३०), मिडकॅप (१९,१६१.२०) आणि स्मॉलकॅप (१८,९४८.६९) या सर्वच निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली. बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांकडून जोरदार खरेदी केली गेली. बाजारामध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे बाजारात नोंदलेल्या सर्वच आस्थांपनांच्या एकत्रित बाजार भांडवलमूल्यामध्ये २.५ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
भांडवलमूल्यामध्ये झाली मोठी वाढ
n मुंबई शेअर बाजारामधील १० प्रमुख आस्थापनांपैकी ७ आस्थापनांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये गेल्या सप्ताहामध्ये १,३७,३९६.६६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. बाजाराने गाठलेल्या नवनव्या उच्चांकामुळे ही वाढ झाली आहे.
n भांडवलमूल्यामधील वाढीत टीसीएस अव्वल स्थानी असून, त्या पाठोपाठ एचडीएफसी बँका आणि हिंदुस्थान युनिलिव्हर आहेत. इन्फोसिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल या अन्य आस्थापनांमध्येही वाढ झाली.
n रिलायन्स इंडस्ट्रिज, कोटक महिंद्र बँक आणि बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये मात्र घट झाली आहे.
सप्ताहातील स्थिती
निर्देशांक बंद मूल्य बदल
संवेदनशील ४८,७८२.५१ +९१३.१५
निफ्टी १४,३४७.२५ +३२८.७५
मिडकॅप १९,१३८.७२ +९७४.२४
स्मॉलकॅप १८,९०८.५९ +६४७.५९