Join us

जेट एअरवेजची सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:46 AM

नामुष्की : विदेशात विमान जप्त

मुंबई : रोख पैशांच्या कमालीच्या टंचाईला तोंड देत असलेल्या जेट एअरवेजने आपली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली असून, देशातील उड्डाणेही कमी कमी करीत आणली आहेत. या पार्श्वभूमीवर या कंपनीच्या अस्तित्वाबद्दलही प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या काही महिन्यांत कंपनीने १५ पेक्षा जास्त छोट्या अंतरांची उड्डाणे रद्द केली आहेत. त्यात आखात, आग्नेय आशिया आणि सार्क देशांचा समावेश आहे. बुधवार आणि गुरुवारदरम्यान जेट एअरवेजने सिंगापूर आणि काठमांडूची उड्डाणे रद्द केली, तर गुरुवारी सायंकाळी अ‍ॅमस्टरडॅम, पॅरिस आणि लंडनची विदेशी उड्डाणे रद्द केली. मुंबई ते कोलकाता, कोलकात्याहून गुवाहाटी आणि डेहराडूनहून गुवाहाटीमार्गे कोलकात्याला जाणारी उड्डाणे रद्द झाल्याचे जेटने म्हटले आहे. थकलेले कर्ज, विलंबाने दिले जाणारे भाडे, इंधन पुरवठादारांसह विक्रेत्यांना विलंबाने दिले जाणारे पैसे, कर्मचाऱ्यांना तात्पुरते किंवा कायमचे काढून टाकणे, यामुळे जेट एअरवेजला गेल्या डिसेंबर महिन्यात आपल्या १२४ विमानांपैकी ८० टक्के विमाने सध्या जमिनीवर आणावी लागली आहेत. सध्या कंपनीची २० पेक्षा कमी विमाने देशांतर्गत उड्डाणांसाठी आहेत.

जेटने पश्चिमेकडील देशांच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांची तिकीट विक्री सात दिवसांसाठी थांबवली आहे. जेटचे विमान युरोपियन कार्गो एजंटने अ‍ॅमस्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर जप्त केल्यामुळे कंपनीची नामुष्की झाली आहे. पैसे न भरल्यामुळे कंपनीला विमान गमवावे लागले आहे. अ‍ॅमस्टरडॅम ते मुंबई या नाईन डब्ल्यू ३२१ विमानात अ‍ॅमस्टरडॅमला प्रवासी बसण्याच्या बेतात असताना विमानाचे उड्डाणच रद्द झाले.इंधन पुरवठा थांबवलाजेट एअरवेजला इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने बुधवारी नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद विमानतळावर इंधन पुरवठा थांबवला. कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे याच विमानतळांवरून होतात. जेट एअरवेज पैसे देऊ न शकल्यामुळे इंधनाचा पुरवठा एका आठवड्यात तिसºया वेळेस थांबवला गेला आहे.

टॅग्स :जेट एअरवेज