नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यान बँकेत जमा झालेल्या नोटांची तपासणी व मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. या काळात बँकेत जमा झालेल्या बाद नोटा, चलनात आणलेल्या नोटांपेक्षा अधिक नाहीत, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चलनातून बाद झालेल्या सर्व नोटा बँकेत परत आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. बाद केलेल्या ९९ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या, असे रिझर्व्ह बँकेनेही मागील वर्षी सांगितले होते.पण अशा नेमक्या किती नोटा बँकेत जमा झाल्या, याबाबत सरकार किंवा रिझर्व्ह बँक यापैकीच कोणीही आजवर स्पष्ट माहिती दिली नव्हती. आता मात्र सरकारने यासंबंधी पहिले स्पष्टीकरण दिले आहे.केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. त्या वेळी चलनातील एकूण नोटांपैकी ८६ टक्के नोटा ५०० व १००० रुपये मूल्याच्या होत्या. बाद झालेल्या या नोटा बदलून घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत होती. त्या काळात या जुन्या नोटा विविध स्वरूपात बँकेत जमा करून बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.>२००० ची नोट राहणारचमार्च-एप्रिलमध्ये दक्षिण भारतात नोटाटंचाई निर्माण झाली होती. प्रामुख्याने २००० च्या नोटा बाजारातून गायब होत्या. ही नोट बंद होणार असल्याची चर्चाही होती. पण २००० ची सध्याची नोट चलनात कायम असेल, रद्द होणार नाही, असे केंद्राने पुन्हा स्पष्ट केले.
नोटाबंदीतील सर्वच नोटा बँकेत परत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 2:53 AM