- प्रसाद गो. जोशी
केंद्रीय अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा पूर्ण न होता अनपेक्षित करांचे लादलेले ओझे, विविध आस्थापनांमधून प्रवर्तकांचा हिस्सा कमी करण्याबाबतची तरतूद , आस्थापनांच्या नफ्याबाबतचा संदेह तसेच मूडीज या संस्थेने दिलेला भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचा इशारा यामुळे गतसप्ताहात बाजारामध्ये मोठी पडझड झालेली दिसून आली. जवळपास सर्वच निर्देशांकांची घसरगुंडी झाल्याचे चित्र दिसून आले.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात संवेदनशील निर्देशांक ३९,४७६.३८ अंशांवर खुला झाला मात्र हीच त्याची सप्ताहातील उच्चांकी धडक राहिली. त्यानंतर तो ३८, ४३५.८७ अंशांपर्यंत खाली गेला. सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक ३८,७३६.२३ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ७७७.१६ अंश म्हणजेच १.९७ टक्कयांनी घट झाली आहे.
राष्टÑीय शेअर बाजारातही मंदीचेच वातावरण होते. येथील निर्देशांकात (निफ्टी) २५८.६५ अंशांची (म्हणजेच २.१९ टक्के) अशी मोठी घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ११,५५२.५० अंशांवर बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकामधील घसरण अधिक तीव्र स्वरुपाची दिसून आली. मिडकॅप १७१.७७ अंशांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ३६५.२५ अंशांनी घसरून बंद झाले.सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १४,५५३.८८ तर स्मॉलकॅप १३,७७६.५८ अंशांवर बंद झाले.
अर्थसंकल्पाकडून बाजाराला काहीही मिळाले नसल्याची भावना प्रबळ असून त्याची प्रतिक्रिया विक्रीच्या स्वरुपामध्ये दिसून आली आहे. त्यातच ‘मूडी’ज या आंतरराष्टÑीय पतमापन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबाबत शंका व्यक्त केली आहे. यामुळेही बाजारात विक्री वाढली. परकीय वित्तसंस्थांनी ३५५१ कोटी रुपयांची खरेदी केली असली तरी समभागांची मात्र विक्री केली आहे.
शुक्रवारी बाजार संपल्यानंतर आलेला इन्फोसिसचा निकाल तसेच घटलेले औद्योगिक उत्पादन आणि वाढलेली महागाई याची जाहीर झालेली आकडेवारी याचा प्रभाव या सप्ताहामध्ये दिसून येईल.
>नऊ प्रमुख आस्थापनांच्या बाजार भांडवलमूल्यात घट
मुंबई शेअर बाजारातील दहा प्रमुख आस्थापनांपैकी नऊ आस्थापनांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ८८हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज या एकमेव आस्थापनेचे बाजार भांडवलमूल्य गतसप्ताहामध्ये वाढल्याचे दिसून आले आहे.
गत सप्ताहामध्ये बाजारामध्ये मोठी घट झाली. त्यामुळे प्रमुख १० पैकी नऊ आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य ८८,६०९.८७ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. बाजार भांडवलमूल्यामध्ये घट होणाऱ्यांपैकी एचडीएफसी बॅँक (२२,३९५.४ कोटी), टीसीएस (२०,१५०.३१ कोटी) आणि हिंदुस्तान युनिलीव्हर (१६,९०७.१० कोटी) या प्रमुख आस्थापना ठरल्या आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्यां बाजार भांडवलमूल्यामध्ये ११,४१५.२१ कोटी रुपयांनी वाढ होऊन ते ८,११,७८२.२० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अर्थसंकल्पीय निराशेमुळे झाली सर्वत्र मोठी घसरण
जवळपास सर्वच निर्देशांकांची घसरगुंडी झाल्याचे चित्र दिसून आले.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:15 AM2019-07-15T04:15:09+5:302019-07-15T04:15:16+5:30