नवी दिल्ली : वार्षिक क्लोजिंगच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व बँक शाखा ३१ मार्चपर्यंत सलग सुरू राहणार आहेत. या काळातील बँकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँका रविवारीही सुरू राहतील.
रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटले आहे की, २०२२-२३ हे वित्त वर्ष ३१ मार्चला संपत आहे. या तारखेपर्यंत सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बँका सलग सुरू ठेवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) यंत्रणेद्वारे होणारे व्यवहारही ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.
सरकारी धनादेशांच्या संकलनासाठी ‘स्पेशल क्लिअरिंग’ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचा ‘पेमेंट व सेटलमेंट’ विभाग (डीपीएसएस) आवश्यक निर्देश जारी करेल. केंद्र व राज्य सरकारच्या व्यवहारांसाठी ‘रिपोर्टिंग विंडो’ १ एप्रिलच्या दुपारपर्यंत सुरू राहील, असे आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे.
पीपीएफ-सुकन्यामध्ये जमा करा किमान रक्कम- तुमचे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) खाते असेल तर ३१ मार्चपूर्वी त्यात आवश्यक किमान रक्कम टाकणे आवश्यक आहे. - किमान रक्कम न टाकल्यास ही खाती बंद होऊ शकतात. ती पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागेल. - पीपीएफमध्ये किमान ५०० रुपये, तर सुकन्या समृद्धी योजनेत किमान २५० रुपये भरणे आवश्यक असते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करून ३१ मार्चपर्यंत बँका सलग सुरू ठेवण्यास सांगितले आहे. ३१ मार्चनंतर मात्र सलग २ दिवस म्हणजेच १, २ एप्रिल रोजी बँकांचे कामकाज होणार नाही.