Join us

Gautam Adani : अदानी समूहात लावलेले सर्वांचेच पैसे सुरक्षित, गौतम अदानींनी दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 10:17 AM

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी लोकांनी त्यांच्या समूहात लावलेल्या पैशांबद्दल विश्वास दिला.

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी लोकांनी त्यांच्या समूहात लावलेल्या पैशांबद्दल विश्वास दिला. अदानी समूहात लावलेला सर्वांचा पैसा सुरक्षित आहे, कारण आमची एकूण संपत्ती आमच्या एकूण कर्जाच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक असल्याचे त्यांनी सांगितलं.

“जर कधी अदानी यांचा फुगा फुटला, तर सर्व बँका बुडतील,” असा प्रश्न रजत शर्मा यांनी इंडिया टीव्हीवर आयोजित एका कार्यक्रमात विचारला. त्यावर अदानी यांनी स्पष्ट उत्तर दिलं. “हा एक चांगला प्रश्न आहे. काही टीकाकारांची इच्छा असू शकते. परंतु मी सांगू इच्छितो की अदानी समूहाची एकूण संपत्ती कर्जाच्या तीन ते चार पट अधिक आहे. आमच्याकडे कोणाचेही पैसे असुरक्षित नाहीत,” असा विश्वास अदानी यांनी दिला. जोपर्यंत भारत पुढे जात राहिल, तोवर हा फुगाही पुढे चालत राहिल, असंही ते म्हणाले.

“कोणताही इन्फ्रा प्रोजेक्ट सुरु करण्यापूर्वी आम्ही इक्विटी लावतो आणि बँकांकडून कर्ज घेतो. यामध्ये ६०:४० असा रेशो असतो. अदानी समूह हा भारतातील एकमेव समूह आहे, ज्यांच्या कंपन्यांची विश्वासार्हता भारताच्या सॉवरेन रेटिंगच्या बरोबरीची आहे. हे रेटिंग कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा बँकेने दिलेले नाही, ते संपूर्ण आर्थिक मूल्यांकनानंतर स्वतंत्र रेटिंग एजन्सीने दिले आहे आणि त्या आधारे बँका कर्ज देतात. २५ वर्षांच्या इतिहासात आम्ही कधीही पैसे भरण्यास एका दिवसासाठीही उशीर केलेला नाही,” असंही अदानी यांनी नमूद केलं.

पंतप्रधानांवरही वक्तव्य“तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी धोरणात्मक चर्चा करू शकता. तुम्ही देशहिताच्या चर्चा करू शकता. परंतु जे धोरण तयार होतं ते सर्वांसाठी तयार होतं, ते केवळ अदानी समूहासाठी तयार होत नाही,” असं अदानी यांनी स्पष्ट केलं. इंडिया टीव्हीवर आयोजित कार्यक्रमात गौतम अदानी यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.

“आपल्या समूहाला प्रमोट केलं जातंय हा एक गैरसमज आहे. यामुळे बँका आणि सामान्यांची बचत धोक्यात येऊ शकते. गेल्या सात आठ वर्षांमध्ये आमच्या कर्जामध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढलं आहे. आज आमची एकूण संपत्ती कर्जाच्या तुलनेत तीन ते चार पट झाली आहे,” असं त्यांनी नमूद केलं. गुंतवणूक करणं आमचं सामान्य काम आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निमंत्रणावरून मी गुंतवणूकदारांच्या संमेलनातही गेलो. त्यानंतर राहुल गांधींनी आमच्या राजस्थानातील गुंतवणूकीचं कौतुक केलं. राहुल गांधींची धोरणंही विकासविरोधी नाहीत याची आपल्याला कल्पना असल्याचं अदानी यांनी राजस्थानमध्ये ६८ हजार कोटींच्या गुंतवणूकीचा उल्लेख करत सांगितलं.

टॅग्स :गौतम अदानीराहुल गांधीनरेंद्र मोदी