Join us

इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी दोन बड्या कंपन्यांची 'युती'?; JSW Group कडून जर्मन ब्रँडशी वाटाघाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 2:42 PM

सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. त्यादृष्टीनं आता अनेक कंपन्या यासाठी पुढाकार घेत आहेत.

जेएसडब्ल्यू ग्रुप (JSW Group) आणि फोक्सवॅगन ग्रुप (Volkswagen) भारतात इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन सुरू करणार आहेत. याअंतर्गत दोन्ही कंपन्यांमध्ये संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही समूहांमध्ये चर्चा सुरू झाली होती, असंही त्यांनी नमूद केलं. 

जेएसडब्ल्यू समूहानं अलीकडेच ओडिशा सरकारसोबत अंदाजे ४०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. या अंतर्गत कटक आणि पारादीपमध्ये इंटिग्रेटेड ईव्ही आणि बॅटरी उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. 

Volkswagen सब्सिडायरीत हिस्सा विकणार? 

सूत्रांनी पुढे सांगितलं की, फोक्सवॅगन आपल्या भारतीय उपकंपनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियामधील आपला काही हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर्मन ऑटो दिग्गज ईव्ही तयार करण्यासाठी भारतातील आणखी एका ऑटोमेकरसोबत भागीदारी करण्याची तयारी करत आहे. यासंदर्भातील प्रश्नावर जेएसडब्ल्यूच्या प्रवक्त्यानं उत्तर दिलंय. आम्ही बाजारातील अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय फोक्सवॅगन ग्रुपनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

जेएसडब्ल्यू आणि एमजीमध्ये करार 

यापूर्वी डिसेंबरमध्ये, जेएसडब्ल्यू समूह आणि एमजी मोटर्स इंडियानं भारतात ईव्ही विकसित करण्यास सहमती दर्शवली होती. तथापि, संयुक्त उपक्रमाच्या फायनान्शिअल डिटेल्सबद्दल माहिती उघड करण्यात आली नाही. दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात JSW ची यात ३५ टक्के भागीदारी असेल.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर