Join us

खर्च कमी अन् फायदा मोठा! 'हा' सुपरहिट व्य़वसाय करून मिळवा 5 पट नफा; करा बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 1:08 PM

Aloevera Farming : कोरफडीची लागवड फायदेशीर ठरत असून चांगला नफा मिळतो. त्यामुळे तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कोरफडीची लागवड करू शकता. 

नवी दिल्ली - कोरफडीचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत. त्यामुळे सध्या कोरफडीपासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारात मागणी वाढली आहे. याचा सर्वाधिक वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये होतो. तसेच हर्बल उत्पादनं आणि औषधांमध्ये देखील कोरफड मोठ्या प्रमाणात वापरली जाते. परिणामी, कोरफडीची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कोरफडीची लागवड फायदेशीर ठरत असून चांगला नफा मिळतो. त्यामुळे तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कोरफडीची लागवड करू शकता. 

कोरफडीची बाजारातील मागणी खूप जास्त आहे आणि कंपन्यांना चांगल्या दर्जाचा माल मिळत नाही. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने कंपन्यांच्या स्टॅंडर्डनुसार कोरफडीचे उत्पादन योग्य पद्धतीने केले तर त्याला यातून लाखो रुपये मिळू शकतात. कोरफडीच्या लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे कमी पाणी असलेल्या भागात किंवा कोरडवाहू शेतीत त्याची लागवड अधिक फायदेशीर ठरते. पाणथळ जमिनीवर कोरफडीची लागवड करता येत नाही. तसंच ज्या ठिकाणी खूप थंडी असते तिथेही कोरफडीची लागवड करता येत नाही. तुम्ही कोरफडीची शेती करताना जमीन कमी उंचीवर आणि शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असेल, याची खात्री करून घ्या. 

अशी करा शेती

कोरफडीची रोपं लावली जातात. कोरफडीची लागवड फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत करता येते परंतु, त्याची लागवड करण्याची योग्य वेळ जुलै-ऑगस्ट आहे. कोरफडीची रोपं लावण्यापूर्वी एका एकरात किमान 20 टन शेणखत टाकावं. 3-4 महिन्यांत चार-पाच पानांचं रोप लावावं. एका एकरात 10,000 रोपं लावता येतात. रोपांची संख्या माती आणि हवामानाच्या प्रकारावर अवलंबून असते. जिथे रोपांची वाढ जास्त होते तिथे रोपांमध्ये जास्त अंतर ठेवलं जातं आणि जिथे वाढ कमी असते तिथे ते कमी अंतरावर लावली जातात.

साधारणपणे रोपं लावण्यासाठी अवलंबली जाणारी जी पद्धत आहे, त्यामध्ये एक मीटर जागेत दोन लाईन रोपं लावून एक मीटर जागा रिकामी ठेवली जाते. यानंतर पुन्हा एका मीटरमध्ये दोन लाईन लावायला हव्यात. एका रोपापासून दुसऱ्या रोपाचं अंतर 40 सेमी आणि लाईन ते लाईन अंतर 45 सेमी असावं. लागवडीनंतर लगेच एक पाणी द्यावं, नंतर आवश्यकतेनुसार पाणी देणं सुरू ठेवावं. गरजेनुसार वेळेवर योग्य प्रमाणात पाणी दिल्यास पानांमधील जेलचं प्रमाण वाढतं.

कोरफडीच्या शेतीसाठी येणारा खर्च किती?

इंडियन काउन्सिल फॉर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चच्या (ICAR) म्हणण्यानुसार, एका हेक्टरमध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी 27,500 रुपये खर्च येतो. तर मजूरी, शेत तयार करणं, खत याचा खर्च गृहित धरून हा खर्च पहिल्या वर्षी 50,000 रूपयांपर्यंत जातो. अशाप्रकारे एकरानुसार बोलायचं झाल्यास 20 हजार रुपये खर्च येतो. एका हेक्टरमध्ये पहिल्या वर्षी सुमारे 450 क्विंटल कोरफडीची पानं मिळतात. कोरफडीच्या पानांचा दर प्रतिक्विंटल 2000 रुपये आहे. अशा प्रकारे एका हेक्टरमध्ये एका वर्षात 9,00,000 रुपयांचे उत्पादन होते. कोरफडीचे उत्पादन दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी वाढते आणि ते 600 क्विंटलपर्यंत पोहोचू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :व्यवसायशेती