Join us  

गुगलमध्ये कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नारळ; ज्यांच्याकडे होती भरतीची जबाबदारी त्यांनाच दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 3:32 PM

Alphabet Layoffs : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.

Alphabet Layoffs : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. यावेळी कंपनीने आपल्या ग्लोबल रिक्रुटमेंट टीममधून शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी अल्फाबेट ही पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीनं आधीच नोकरभरतीची गती कमी केली आहे. टेक कंपन्यांनी २०२३ च्या सुरुवातीला कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली होती, हे सत्र अद्यापही थांबलेलं नाही. अल्फाबेटसह, मेटा आणि अॅमेझॉनसह अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी आधीच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अल्फाबेटनं शेकडो पदं सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतलाय. हा व्यापक स्तरावरील कर्मचारी कपातीचा भाग नाही. महत्त्वाच्या कामांसाठी टीमची संख्या कायम ठेवली जाईल. अल्फाबेटनं जानेवारीमध्ये भरती आणि इंजिनिअरिंग टीममधील सुमारे १२००० नोकऱ्या कमी केल्या. कर्मचार्‍यांची ही कपात जगभरात करण्यात आली. ही कर्मचारी कपात एकूण कर्मचाऱ्यांच्या ६ टक्के होती. दुसरीकडे Amazon ने १८००० कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. मायक्रोसॉफ्टनेही १० हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

म्हणून कर्मचारी कपातआर्थिक अनिश्चिततेच्या दरम्यान, जगभरातील टेक कंपन्या त्यांचं कार्य तर्कसंगत करण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी नोकऱ्या कमी करत आहेत. याच कारणामुळे गुगलशिवाय अॅमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक टेक कंपन्यांनी या वर्षी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय.

टॅग्स :गुगलनोकरी