नवी दिल्ली : नोटाबंदीला चार महिने झाल्यानंतरही नवी दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर गोंधळाची स्थिती दिसून आली. जुन्या नोटा बदलून मिळतील या आशेने लोकांनी रिझर्व्ह बँकेबाहेर तुफान गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातील बहुतांश लोकांना निराश होऊनच परतावे लागले. अनेक जण नोटा बदलून घेण्यास पात्र नव्हते, तर अनेकांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती.
३0 डिसेंबरला नोटाबंदीची मुदत संपली. देशाबाहेर असलेल्या नागरिकांसाठी नोटा बदलून घेण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच अनिवासी भारतीयांसाठी ही मुदत ३0 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. ३१ मार्च जवळ आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर गर्दी वाढली आहे. तथापि, या दोन्ही गटातील नागरिकांनाही येथे नोटा बदलून दिल्या जात नसल्याचे आढळून आले. त्यांना नोटा आपल्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले.
बुधवारी दिवसभर कार्यालयाबाहेर तुफान गर्दी दिसून आली. मात्र गर्दीत नोटा बदलून घेण्यास पात्र नसलेल्यांची संख्याच जास्त असल्याचे आढळून आले. सकाळी ६ वाजताच लोक रांगा लावून बसल्याचे दिसून आले. रांगेत असलेल्यांपैकी अनेकांना ३0 डिसेंबरपर्यंत नोटा बदललायला वेळ मिळाला नाही, तर अनेकांना असे वाटले की, रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात नोटा बदलून घेण्याचा पर्याय सर्वांसाठीच उपलब्ध आहे.
चार तास रांगेत असलेल्या राजकुमारी शर्मा यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये मी नोटा बदलून घ्यायला गेले होते. पण बँकेबाहेरच्या गर्दीत रेटारेटी झाल्याने माझा हात मोडला. त्यावर सर्जरी करावी लागली. संपूर्ण नोव्हेंबरमध्ये मी रुग्णालयात होते. तसेच डिसेंबरमध्ये प्लास्टर कायम होते. माझ्याकडील नोटा बदलून घ्यायला मला बँकेत जाताच आले नाही. म्हणून येथे आले आहे.
पासपोर्टवर नोंदी, तरीही...
मोहंमद नौशाद नावाच्या कामगाराने सांगितले की, मी जानेवारीमध्ये दुबईतून भारतात परत आले. नोटाबंदीच्या काळात मी भारताबाहेर होतो. माझ्या पासपोर्टवर बहिर्गमन आणि आगमनाच्या नोंदी आहेत. आता रिझर्व्ह बँकेचे अधिकारी म्हणत आहेत की, मी या नोटा देशाबाहेरून आणल्या आहेत, असे प्रमाणपत्र कस्टम अधिकाऱ्यांकडून घेऊन या. असे प्रमाणपत्र आता मिळणार कसे?
रिझर्व्ह बँकेबाहेर नोटागोंधळ कायमच
नोटाबंदीला चार महिने झाल्यानंतरही नवी दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर गोंधळाची स्थिती दिसून आली.
By admin | Published: March 31, 2017 12:29 AM2017-03-31T00:29:53+5:302017-03-31T00:29:53+5:30