ज्या कंपनीत पहिली नोकरी मिळाली त्याच कंपनीतून निवृत्त होणं हा कोणासाठीही अभिमानाचा क्षण आहे. हा अभिमानाचा क्षण लार्सन अँड टुब्रो या दिग्गज कंपनीचे अध्यक्ष ए.एम.नाईक यांच्या वाट्याला आलाय. जवळपास सहा दशकांपासून कंपनीमध्ये सेवा बजावत असलेले नाईक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. कनिष्ठ अभियंता म्हणून कंपनीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे नाईक चेअरमनपदापर्यंत पोहोचले. आता त्याच कंपनीतून ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ, कंपनीनं भागधारकांना ६ रुपयांचा विशेष लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय. लार्सन अँड टुब्रोला (L&T) मोठ्या उंचीवर नेणाऱ्या ए.एम. नाईक यांची एखाद्या चित्रपटापेक्षाही कमी नाही.
६७० रुपये वेतननाईक हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते आणि त्यांचे वडील तसंच त्यांचे आजोबा दोघेही शिक्षक होते. ते गुजरातमधील शाळेत शिकवत असत. नाईक यांचं सुरुवातीचं शिक्षण गावातील शाळेतून झालंय. त्यांनी गुजरातच्या बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन केलं. जेव्हा त्यांनी नोकरी शोधण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांनी एल अँड टीमध्ये अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. एल अँड टीमध्ये त्यावेळी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जात होतं.
ETPanache ला त्यांनी २०१८ मध्ये मुलाखत दिली होती. एल अँड टीमधून रिजेक्ट केल्यानंतर आपण नेस्टर बॉयलर्समध्ये नोकरी सुरू केल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एल अँड टी मध्ये हायरिंग सुरू केल्याचं त्यांना समजलं. त्यावेळी ते पुन्हा त्या ठिकाणी गेले. त्यांना त्यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसंच त्यांना इंग्रजी सुधारण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदा त्यांना कमी पगारावर ज्युनिअर इंजिनिअर पदावर नियुक्त करण्यात आलं. १५ मार्च १९६५ रोजी त्यांनी तिकडे नोकरी करण्यास सुरूवात केल्याचं त्यांनी सांगितलं.
तिकडेच बनले बॉसएल अँड टीमध्ये कामावर रुजू झाले तेव्हा नाईक यांचं वेतन ६७० रुपये प्रति महिना होतं. त्यावेळी त्यांना आपण १००० रुपये वेतनावर रिटायर होऊ असं वाटलं होतं. परंतु सहा महिन्यांनंतर त्यांचं वेतन ७६० रुपयांवर गेलं. एका वर्षानंतर त्यांना ९५० रुपये वेतन मिळू लागलं. युनियन अॅग्रीमेंटनंतर त्यांच्या वेतनात पुन्हा ७५ रुपयांची वाढ झाली आणि त्यांचं वेतन १०२५ रुपयांवर पोहोचलं. तसंच नंतर ते ज्युनिअर इंजिनिअरवरून असिस्टंट इंजिनिअर बनले.
१९९९ मध्ये नाईक त्याच कंपनीचे सीईओ बनले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना एल अँड टी समूहाच्या चेअरमन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी आपलं काम आणि मेहनतीच्या जोरावर हे पद मिळवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचीही मोठी प्रगती झाली. २०२३ मध्ये कंपनीचं एकूण असेट्स ४१ अब्ज डॉलर्स होतं. कंपनीनं डिफेन्स, आयटी, रियल इस्टेट अशा अनेक क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केलं. आज कंपनीचा ९० टक्के महसून त्या व्यवसायातून येतो जो नाईक यांनी सुरू केला.
कोट्यवधींचं दान
आपल्याकडे २ जोडी बूट, ६ शर्ट आणि २ सूट असल्याचं त्यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. आपलं वॉर्डरोब किती भरलंय याकडे लक्ष न देता आपलं काम चालावं इतकंच सामान आपण ठेवतो असं ते म्हणाले. २०१७-१८ मध्ये त्यांचं वेतन १३७ कोटी रुपये होत. त्यांचं नेटवर्थ ४०० कोटी रूपये होतं. २०१६ मध्ये त्यांनी आपली ७५ टक्के संपत्ती दान केली. जर आपला मुलगा आणि सून अमेरिकेहून परत आले नाहीत, तर आपली संपूर्ण संपत्ती दान करून असं त्यांनी सांगितलं होतं. ते दोघंही डॉक्टर आहेत. ते आपल्या संपत्तीचा बहुतांश हिस्सा शाळा आणि रुग्णालयांच्या चॅरिटीवर दान करतात. त्यांनी २०२२ मध्ये १४२ कोटी रूपयांचं दान दिलं होतं.