Aman Gupta Boat IPO : हेडफोन आणि इयरफोनचं उत्पादन करणारी कंपनी बोट आयपीओद्वारे शेअर बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. बोटनं पुढील आर्थिक वर्षासाठी आपल्या ३००-५०० मिलियन डॉलर्सच्या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, गोल्डमॅन सॅक्स आणि नोमुरा यांची बँकर म्हणून नियुक्ती केली आहे. मंनीकंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय सिक्युरिटीज आयपीओचं नेतृत्व करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी १.५ बिलियन डॉलर्सपेक्शा अधिकच्या मूल्यांकनाची मागणी करू शकते.
यापूर्वीही केलेला अर्ज
बोटनं २०२२ मध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता. परंतु बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्णय पुढे ढकलला. यानंतर गुंतवणूकदार वारबर्ग पिंक्स आणि मालाबार इन्व्हेस्टमेंकडून स्टॉकच्या बदल्यात १.२ बिलियन डॉलर्सच्या किमान मूल्यांकनावर प्रायव्हेट फंडिंगमधून ६० मिलियन डॉलर्स उभे केले होते.
कोणाकडे किती हिस्सा?
बोटच्या शेअरहोल्डर्सबाबत सांगायचं झालं तर यात २६.८० टक्के हिस्सा अमन गुप्ता यांच्याकडे आहे. तर समीर मेहता यांच्याकडे २६.८० टक्के शेअर्स आहेत. फायरसाईड व्हेन्चर्सबाबत सांगायचं झालं तर बोटमध्ये त्यांचा ३.६० टक्के, वारबर्ग पिंक्स आणि मालाबार इव्हेस्टमेंट्सकडे अनुक्रमे ३८.३० टक्के आणि १ टक्के हिस्सा आहे.
२०१५ मध्ये कंपनीची सुरुवात
अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी २०१५ मध्ये बोट या कंपनीची स्थापना केली होती. कंपनीनं आतापर्यंत १७१ मिलियन डॉलर्सचं फंडिंग मिळवलं आहे. भारतातील वेअरेबल्स सेगमेंटमध्ये त्यांचा २६.७ टक्के हिस्सा आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल ५ टक्क्यांच्या घसरणीसह ३,२८५ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा तोटा कमी होऊन तो ७०.८ कोटी रुपयांवर आला. बोटनं पॉझिटिव्ह एबिटाची नोंद केली. दिवाळीच्या सणादरम्यान कंपनीच्या विक्रीत तेजी नोदवण्यात आली.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)