Join us  

रेडिओ रिपेअर करणाऱ्या अमर बोस यांनी अशी उभी केली टॉप साऊंड कंपनी, असा आहे BOSE चा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 2:09 PM

अमर बोस हे जवळपास ४५ वर्ष एमआयटीमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.

नोनी गोपाल बोस हे स्वातंत्र्यसैनिक होते. परंतु इंग्रज मागे लागल्यानंतर त्यांना अमेरिकेत जावे लागले. 1920 मध्ये ते अमेरिकेत पोहोचले आणि त्यानंतर एका अमेरिकन महिलेशी लग्न केले. 1929 मध्ये अमर बोस यांचा जन्म झाला. अमर बोस यांचा जन्म झाला, पण तेव्हा त्यांचे वडील नोनी गोपाल यांच्याकडे पत्नी आणि मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यासाठीही पैसे नव्हते. संपूर्ण पैसा शेअर बाजारात बुडाला होता. अशा परिस्थितीत त्यांना मित्रांकडून कर्ज घ्यावे लागले.

पुढे जाऊन अमर बोस यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि नंतर साऊंड सिस्टम इंडस्ट्रीचे बादशाह देखील झाली. बोस या कंपनीच्या प्रोडक्ट्सचे अनेक चाहते आहेत. अनेक मोठ्या इव्हेंट्समध्येही बोसच्या सिस्टम्स पाहायला मिळतात. पाहूया काय आहे याची सक्सेस स्टोरी.

रेडिओ रिपेअर करायचे अमर बोस

अमर बोस यांना लहानपणापासूनच इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात रस होता. त्यांना वस्तूंच्या दुरुस्तीचीही आवड होती. एकदा एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, आपण जुना माल विकत घ्यायचो आणि तो दुरुस्त करायचो. त्यांनी त्यांच्या घराच्या तळघरात रेडिओ दुरुस्तीचे काम सुरू केले. यातून ते आपल्या पॉकेटमनीची व्यवस्था करत असत. बोस साऊंड सिस्टीममध्ये खूप आवड निर्माण झाली आणि मग त्यांनी जगातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या एमआयटीमध्ये प्रवेश घेतला.

अशी सुरू केली कंपनीएमआयटीमध्ये व्हाय डब्ल्यू ली नावाचे एक प्राध्यापक होते. त्यांनीच बोस यांची प्रतिभा ओळखून त्यांना इलेक्ट्रिकल कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला. बोस यांच्याकडे अनेक पेटंट होते, जी त्यांनी कोणत्याही कंपनीला विकली नाहीत. अशा परिस्थितीत प्राध्यापकांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्ली यांनी त्यांना अगदी साधे नाव ठेवण्याचा सल्ला दिला होता, जे लोकांच्या ओठावर जाईल. अशा प्रकारे कंपनीचे नाव पडले - बोस.

खुद्द अमर बोस बाजारात असलेल्या कोणत्याही साउंड सिस्टीमवर समाधानी नव्हते, म्हणून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. बोस एमआयटीमध्ये सुमारे ४५ वर्षे प्राध्यापकही होते. त्याच वेळी, एका व्याख्यानात ते म्हणाले होते की, नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा मार्ग तयार करा.

नासालाही बोस सिस्टम्सची भूरळबोस कॉर्पोरेशनची स्थापना 1964 मध्ये झाली. कंपनीचे पहिले प्रोडक्ट (स्टिरीओ) 1966 मध्ये लाँच झाले. मार्केटमध्ये या प्रोडक्टनं वाहवा मिळवली.  यानंतर कंपनीनं 1968 मध्ये BOSE 901 नावाची स्पीकर सिस्टीम लाँच केली आणि या उत्पादनाने सर्वांचीच पसंती मिळवली. यानंतर कंपनीची गाडी सुरू झाली आणि त्यानंतर बोस यांनी मागे वळून पाहिले नाही.

आज बोस साऊंड सिस्टम जगात एक प्रीमियम श्रेणीचे प्रोडक्ट बनले आहे. नासासारख्या अंतराळ संस्थाही साऊंड सिस्टमसाठी बोसची मदत घेतात. अमर बोस यांचे 2013 मध्ये निधन झाले. त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती काही अब्ज डॉलर्समध्ये असेल. पण पैशाने काही फरक पडत नाही, असे ते नेहमी म्हणत असत. त्यांनी त्यांच्या अर्ध्याहून अधिक संपत्ती एमआयटीला दानदेखील केली आहे.

टॅग्स :संगीतनासा