Join us

वेटर झाला व्यावसायिक! दिवसाला ७ रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने उभा केला ३ कोटींचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 2:21 PM

Amardeep Kumar : एकेकाळी दिवसाला फक्त ७ रुपये कमावणाऱ्या अमरदीप यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीने तब्बल ३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.

बिहारचे रहिवासी अमरदीप कुमार यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. एकेकाळी दिवसाला फक्त ७ रुपये कमावणाऱ्या अमरदीप यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीने तब्बल ३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. समस्तीपूरमध्ये अगरबत्तीचा कारखाना चालवणाऱ्या अमरदीप यांचं बालपण गरिबीत गेलं. आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत. 

अमरदीप य़ांचा जन्म बिहारमधील एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये काम करायचे, जिथे त्यांना दिवसाला फक्त सात रुपये मिळायचे. रेस्टॉरंटमध्ये वेटर होण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत अनेक कामं केली. या संघर्षानंतरही त्यांनी शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिलं.

१९८९ ते १९९६ या काळात रेस्टॉरंटमध्ये काम करत असताना अमरदीप यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पाटणा आणि नंतर दिल्लीला जाऊन नागरी सेवेत रुजू होण्याचं ध्येय ठेवलं. पण त्यात त्यांना यश आलं नाही. बंगळुरूमध्ये कॉर्पोरेट जगतात ते काम करत होते. पण काम करताना त्यांना समाधान मिळत नव्हतं. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांपासून प्रेरणा घेऊन त्यांना लोकांना मदत करण्याची इच्छा झाली. 

२०१९ मध्ये अमरदीप यांनी सहा लाख रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीने 'मोरंग देश व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' ची स्थापना केली. कंपनी विविध प्रकारच्या अगरबत्ती बनवते. त्यांच्या व्यवसायात आता १०० हून अधिक स्थानिक कामगार आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपये आहे. अमरदीप यांचा यशस्वी प्रवास अनेकांना प्रेरणा देतो. प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने काहीही शक्य करता येतं.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय