Join us

Amazon खरेदी करणार आयनॉक्समधील हिस्सेदारी; मनोरंजन क्षेत्रात शिरकाव करण्याची हीच संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 7:06 AM

कोविड-१९ साथीमुळे मागील दीड वर्षापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे या कंपन्या अडचणीत आहेत

नवी दिल्ली : चित्रपटगृह साखळी आयनॉक्स लिझर लिमिटेडसह इतर काही कंपन्यांतील हिस्सेदारी करण्याचे प्रयत्न ॲमेझॉन इंडियाकडून सुरू असून, त्यासाठी संबंधित कंपन्यांशी बोलणी केली जात आहे.

मनाेरंजन क्षेत्रातील व्यवसायात वैविध्य आणण्याचे प्रयत्न ॲमेझॉन कडून सुरू आहेत. त्यासाठी साखळी चालविणाऱ्या कंपन्यांतील हिस्सेदारी खरेदी करण्याचा मार्ग चोखाळला जात आहे. ॲमेझॉनचा ओटीटी कंटेंट व्यवसाय वाढेनासा झाला आहे. ॲमेझॉनने ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडिओ’ हा २०१६ मध्ये सुरू केला होता. सहा महिने वाढ चांगली  होती. नंतर मात्र व्यवसाय गती घेईनासा झाला. त्यामुळे व्यवसायात वैविध्य आणण्याच्या प्रयत्नात आहे. 

कोविड-१९ साथीमुळे मागील दीड वर्षापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे या कंपन्या अडचणीत आहेत. या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी ही संधी आहे, असे ॲमेझॉनला वाटते. प्रवक्त्याने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

कंपन्या तोट्यात आयनॉक्स लिझर ही भारतातील मोठ्या चित्रपटगृह श्रृंखलांपैकी एक असून, देशभरात कंपनीची १५३ मल्टिप्लेक्सेस आणि ६४८ स्क्रीन आहेत. मार्च २०२१ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला २५७ कोटी रुपयांचा तोटा झाला. २०१९-२० मध्ये कंपनीला १४१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. या क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी पीव्हीआर लि.ला ६६५.६४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आदल्या वर्षात कंपनीला १३१.०४ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनकोरोना वायरस बातम्या