नवी दिल्ली: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टनं 5 दिवसांच्या महासेलमध्ये तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या सामानाची विक्री केली आहे. ऑनलाईन ई-कॉमर्स क्षेत्रातील मातब्बर कंपन्या असेलल्या फ्लिपकार्ट, अॅमेझॉननं गेले 5 दिवस सेल आयोजित केला होता. या माध्यमातून अनेक वस्तूंवर मोठी सवलत देण्यात आली होती. या दोन्ही कंपन्यांच्या सेलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. स्मार्टफोन, मोठी उपकरणं आणि फॅशन श्रेणीत येणाऱ्या वस्तूंवर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टनं मोठमोठ्या ऑफर्स दिल्या होत्या. त्यामुळे या उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाली. या दोन्ही कंपन्यांनी महासेलच्या माध्यमातून तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या (दोन अब्ज डॉलर्स) उत्पादनांची विक्री केल्याची माहिती रेडसीर कन्सल्टिंगनं त्यांच्या अहवालात दिली आहे. गेल्या वर्षीदेखील सणांच्या कालावधीत ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी सेल आयोजित केला होता. त्यावेळी या कंपन्यांनी 10 हजार 325 कोटी रुपये म्हणजेच 1.4 अब्ज डॉलर्स किमतीच्या सामानाची विक्री केली होती. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाचं विश्लेषण रेडसीर कन्सल्टिंगनं केलं आहे. लहान शहरांमधील ग्राहक वर्ग वाढल्यानं सेलला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं रेडसीर कन्सल्टिंगनं त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे. सामान्यांना परवडणारे दर, लॉयल्टी योजना यामुळेही विक्रीत मोठी वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ग्राहकांकडून सेलला उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती अॅमेझॉन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी दिली. 'यंदाच्या ग्रेट इंडियन फेस्टिवलच्या पहिल्या 36 तासांमध्येच गेल्या वर्षीच्या सेलचा विक्रम मोडीत निघाला. यंदा जवळपास सर्वच श्रेणींमधील उत्पादनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे आमचे 80 टक्क्यांहून अधिक नवे ग्राहक छोट्या शहरांमधील आहेत. ज्या पिन कोडवर आम्ही सेवा देतो, त्यातील 99 टक्के पिनकोडवरुन आम्हाला गेल्या 4 दिवसात ऑर्डर मिळाल्या आहेत,' असं अग्रवाल यांनी सांगितलं.
अवघ्या 5 दिवसात अॅमेझॉन, फ्लिपकार्टकडून 15 हजार कोटींच्या सामानांची व्रिकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:25 AM