नवी दिल्ली : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती वाढून १७२ अब्ज डॉलर झाली असून, त्यांची घटस्फोटित पत्नी मॅकेन्झी बेझोस जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत महिला ठरली आहे.
जेफ आणि मॅकेन्झी यांनी गेल्या वर्षी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटात द्याव्या लागलेल्या पोटगीमुळे जेफ यांची संपत्ती घटली होती. बुधवारी अॅमेझॉनच्या समभागांची किंमत तब्बल ४ टक्क्यांनी वाढून २,८७९ डॉलर झाली. त्यामुळे जेफ यांची संपत्ती वाढून १७२ अब्ज डॉलर झाली. याआधी सप्टेंबर २0१८ मध्ये त्यांच्या संपत्तीचे उच्चांकी मूल्य १६८ अब्ज डॉलर होते.
‘ब्लुमबर्ग बिलेनियर्स’च्या माहितीनुसार, यंदा जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ५७ अब्ज डॉलरची भर पडली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात मंदीची लाट असताना अॅमेझॉनचे समभाग तेजीत असल्यामुळे त्यांची संपत्ती वाढत आहे. कंपनीने मात्र त्यांच्या संपत्तीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करणे टाळले आहे. सूत्रांनी सांगितले की, कोरोनामुळे लोक थेट दुकानांतून खरेदी करायचे टाळून आॅनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कंपनीचे समभाग तेजीत आहेत.
संपत्तीत सर्वाधिक वाढ झालेल्या व्यक्तींच्या यादीत बहुतांश उद्योगपती तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्सचे संस्थापक एरिक युआन यांचा त्यात समावेश आहे. अॅमेझॉनमध्ये जेफ बेझोस यांची ११ टक्के हिस्सेदारी आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत अॅमेझॉनचा वाटा सर्वाधिक आहे. घटस्फोटानंतर मॅकेन्झी बेझोस यांना अॅमेझॉनमधील ४ टक्के हिस्सेदारी मिळाली. मॅकेन्झी यांची एकूण संपत्ती आता ५७ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लुमबर्गच्या मानांकनात त्यांनी १२ वे स्थान पटकावले आहे. अलीकडेच त्यांनी अॅलीस वॉल्टन आणि ज्युलिया फ्लेशर कोच यांना मागे टाकून जगातील दुसºया क्रमांकाची श्रीमंत महिला होण्याचा मान पटकावला. ‘लॉरियल’च्या फ्रँकॉईज बेट्टेनकोर्ट मायर्स या पहिल्या स्थानी आहेत.