Join us

Amazon Jeff Bezos: कर्मचारी कपातीचा निर्णयाने मोठे नुकसान! जेफ बेजोस यांनी एका दिवसांत गमावले ६७० मिलियन डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 2:13 PM

Amazon Jeff Bezos: ॲमेझॉनचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले असून, कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा जेफ बेजोस यांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

Amazon Jeff Bezos: एकीकडे कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर होत असताना, दुसरीकडे जगात मंदीचे सावट असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेकविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र, जगभरात ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ॲमेझॉन कंपनीने तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला. याचा मोठा फटका ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांना बसला आहे. जेफ बेजोस यांना एकाच दिवसांत  ६७० मिलियन डॉलर्स गमावावे लागले आहेत. 

जेफ बेजोस यांनी स्थापन केलेल्या ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचे शेअर्स बुधवारी जवळपास १ टक्क्यांनी घसरले. ॲमेझॉन कंपनीकडून करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे कंपनीने १८ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय कंपनीचे सीईओ जस्सी यांनी घोषित केला. जस्सी यांनी या निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून अनिश्चित अर्थव्यवस्था आणि जलद भरतीला जबाबदार धरले आहे.

जेफ बेजोस यांच्या निव्वळ संपत्तीवर मोठा परिणाम

ॲमेझॉन स्टॉकच्या किंमतीतील घसरणीमुळे संस्थापक जेफ बेजोस यांच्या निव्वळ संपत्तीवरही परिणाम झाला आहे. जेफ बेजोस यांना एका दिवसांत ६०० मिलियन डॉलर्सपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बुधवारच्या समाप्तीपर्यंत जेफ बेजोस यांना ६७५ मिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे. आताच्या घडीला जेफ बेजोस जगातील सहाव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. अलीकडील काही महिन्यांत जेफ बेजोस यांचे श्रीमंतांच्या यादीतील स्थान सातत्याने घसरताना दिसत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, भारतीय उद्योगपती आणि देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनले होते.

दरम्यान, ॲमेझॉन कंपनीने १८ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली असून, १८ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यापूर्वी कंपनीने १० हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्याबाबत सांगितले होते. गतवर्षीच्या सप्टेंबरच्या अखेरीस ॲमेझॉनचे १.५ दशलक्षाहून अधिक कर्मचारी होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अ‍ॅमेझॉननोकरी