नवी दिल्ली – सध्या मार्केटमध्ये सर्वात चर्चेत असणाऱ्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अमेझॉन मैदानात उतरली आहे. अमेझॉन भारती एअरटेल या कंपनीत तब्बल २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये त्याबाबत चर्चा सुरु आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक वाढत आहे. अलीकडेच फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
जर अमेझॉन आणि एअरटेल यांच्यात हा करार झाला तर एअरटेलमध्ये अमेझॉनची ५ टक्के भागीदारी असणार आहे. परंतु हे भारती एअरटेलच्या त्यावेळच्या किंमतीवर निर्भर आहे. भारती एअरटेल ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलचे जवळपास ३० कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची जिओ आणि भारती एअरटेल एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.
जिओने नुकतेच फेसबुक, केकेआरसह अनेक गुंतवणूकदारांकडून १० अब्ज डॉलर्स जमा केले आहेत. अमेझॉन आणि भारती एअरटेल यांच्यातील चर्चेमधील सूत्रांनी सांगितले आहे की, आता दोन्ही कंपन्याचा संवाद सुरु आहे. या व्यवहारातील नियम-अटी कदाचित बदलू शकतात किंवा करारही होऊ शकत नाही. अमेझॉनच्या प्रवक्त्यांनी कंपनी भविष्य काय करेल अथवा काय नाही याबाबतच्या चर्चेवर कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचं सांगितलं आहे.
तर आपले प्रोडक्ट्स, सेवा आणि ग्राहकांना सुविधा देण्यासाठी कंपनी डिजिटल भागादारांसोबत काम करत राहील त्याशिवाय जास्त काही सांगण्यात अर्थ नाही असं एअरटेलने म्हटलं आहे. अमेझॉन भारताला प्रगतीसाठी संभाव्य क्षमता असलेली बाजारपेठ म्हणून पाहत आहे. त्यांनी आपला ई-कॉमर्स व्यवसाय वाढविण्यासाठी ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आहे. अलीकडेच त्यांनी व्हॉईस अॅक्टिवेटेड स्पीकर्स म्हणून भारतात डिजिटल सेवा देखील सुरू केली आहे.
तत्पूर्वी जनरल अटलांटिकनं जिओमध्ये १.३४ टक्के इतकी भागिदारी खरेदी केली आहे. गेल्या पाच आठवड्यांत जिओमध्ये चौथ्यांदा जिओमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. गेल्या महिन्याभरात मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये ६७ हजार १९४ कोटींची गुंतवणूक झाली. फेसबुकनं जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतवून ९.९ टक्के भागिदारी विकत घेतली. यामुळे फेसबुक जिओमधील सगळ्यात मोठी भागीदार कंपनी झाली. विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमध्ये ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचं जाहीर केलं. विस्टानं जिओमध्ये २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला.