Join us

अ‍ॅमेझॉन फूड डिलीव्हरी करणार; झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 4:23 PM

लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता लवकरच झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार आहे कारण अ‍ॅमेझॉन फूड डिलीव्हरी क्षेत्रात उतरणार आहे. स

ठळक मुद्देअ‍ॅमेझॉन आता लवकरच झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार आहे कारण अ‍ॅमेझॉन फूड डिलीव्हरी क्षेत्रात उतरणार आहे.उद्योजक नारायण मूर्ती यांच्या कॅटामारन कंपनीसोबत अ‍ॅमेझॉन भागीदारी करणार असल्याची माहिती मिळत आहे.अ‍ॅमेझॉनने या नव्या व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास देखील सुरुवात केली आहे.

बंगळुरू - लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता लवकरच झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार आहे कारण अ‍ॅमेझॉन फूड डिलीव्हरी क्षेत्रात उतरणार आहे. सध्या ग्राहक ऑनलाईन फूड मागवण्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे ऑनलाईन फूड सर्व्हिसचा व्यापार दिवसेंदिवस हा वाढत आहे. तसेच फूड ऑर्डर करण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सचाही वापर केला जातो.

2018 मध्ये ऑनलाईन जेवण ऑर्डर करणाऱ्यांच्या संख्येत 176 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या स्विगी आणि झोमॅटो या कंपन्याचं या क्षेत्रात वर्चस्व आहे. अ‍ॅमेझॉनने ही आता या क्षेत्रात उडी घेतली आहे. यासाठी उद्योजक नारायण मूर्ती यांच्या कॅटामारन कंपनीसोबत अ‍ॅमेझॉन भागीदारी करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन उबेर इट्स खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अ‍ॅमेझॉनने या नव्या व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास देखील सुरुवात केली आहे. तसेच अ‍ॅमेझॉन फेस्टिव्ह सीझन म्हणजेच सणांच्या काळात सप्टेंबरमध्ये ही नवीन फूड डिलिव्हरी सेवा लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र अ‍ॅमेझॉनने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. अ‍ॅमेझॉन या क्षेत्रात आल्यास झोमॅटो, स्विगी, उबर ईट्ससह फूड डिलीव्हरी करणाऱ्या कंपन्यांसाठी आव्हान असणार आहे. 

गुगल आणि अ‍ॅपलसारख्या लोकप्रिय कंपन्यांना मागे टाकत अ‍ॅमेझॉन ही कंपनी नंबर वन ठरली आहे. अ‍ॅमेझॉन जगातील सर्वात जास्त व्हॅल्यूएबल ब्रँड झाला आहे. ब्रँड मूल्य राखणाऱ्या कंपनीच्या यादीत अ‍ॅमेझॉननंतर अ‍ॅपल आणि गुगलचा नंबर लागतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अ‍ॅमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कॅन्टर या संस्थेने 100 कंपन्यांची एक यादी मंगळवारी (11 जून) प्रसिद्ध केली आहे. कॅन्टर ही संस्था जागतिक बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे मूल्यांकन करते. यानुसार अ‍ॅमेझॉनने अ‍ॅपल आणि गुगलला मागे टाकत बाजी मारली आहे. अ‍ॅमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 31550 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 21.90 लाख कोटी रुपये आहे. तर अ‍ॅपल दुसऱ्या स्थानी आहे. अ‍ॅपलचे ब्रँड मूल्य 30950 कोटी डॉलर म्हणजेच 21.49 लाख आहे. तिसऱ्या स्थानी गुगल असून त्याचे ब्रँड मूल्य 30900 कोटी डॉलर म्हणजेच 21.46 लाख कोटी रुपये आहे.  

वितरणासाठी अ‍ॅमेझॉन घेणार विद्यार्थी, गृहिणी यांची मदत

अ‍ॅमेझॉन इंडियाने विद्यार्थी, गृहिणी आणि निवृत्त व्यावसायिकांना अर्ध-वेळ रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत. एक म्हणजे शिखर हंगामात (पीक सिझन) वितरण गतिमान राहण्यास मदत होईल आणि दुसरे म्हणजे उबेरप्रमाणे लवचिक रोजगारांची निर्मितीही करता येईल. गतिमान आणि विश्वसनीय वितरण हा ई-कॉमर्स व्यवसायाचा आत्मा आहे. योग्य उत्पादनाचे वर्गीकरणाइतकीच ही बाबही महत्त्वाची आहे. गतिमान वितरणासाठी अ‍ॅमेझॉन इंडियाने याआधी अनेक पद्धती वापरल्या. एक दिवसात, दोन दिवसात अथवा नियोजित पोहोच यांचा त्यात समावेश आहे. अ‍ॅमेझॉनच्या ‘प्राईम ऑफर्स’मध्ये दुसऱ्या दिवशी वस्तू ग्राहकाच्या घरी पोहोचते. ठराविक वस्तूंवर ही योजना लागू आहे. ‘प्राईम नाऊ’मध्ये दोन तासांत पोहोच दिली जाते. किराणा सामान पोहोचविण्यासाठी प्राईम नाऊचा प्रामुख्याने वापर होतो.

 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनव्यवसायअन्न