Piyush Goyal On Amazon : सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. लोक घरात बसून मोठ्या प्रमाणात खरेदीही करताना दिसतात. Amazon, Flipkart सारख्या सर्वच कंपन्या लोकांना ऑनलाइन शॉपिंगसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. ईकॉमर्स कंपन्यांच्या वाढत्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अॅमेझॉनला फटकारलंय. पीयूष गोयल यांनी अॅमेझॉनकडून भारतात होत असलेल्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केलेत.
"मोठा उपकार करत नाही"
"कंपनी गुंतवणूक करून भारतावर कोणताही मोठा उपकार करत नाहीये. ई-कॉमर्स कंपनीनं केलेली गुंतवणूक केवळ कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी आहे," असं पीयूष गोयल अॅमेझॉनच्या गुंतवणूकीवर भाष्य करताना म्हणाले. अॅमेझॉननं भारतात अमेरिकन कंपनी भारतीय अर्थव्यवस्थेची कोणतीही मोठी सेवा करत नाही, तर देशात झालेल्या नुकसानीची भरपाई करत असल्याचं गोयल म्हणाले. "अॅमेझॉनचा भारतातील मोठा तोटा प्रत्यक्षात अत्यंत कमी किमतीत उत्पादनांची विक्री केल्याचं दाखवून देतो. परंतु हे भारतासाठी चांगलं नाही, कारण त्याचा परिणाम लाखो छोट्या किरकोळ विक्रेत्यांवर होतो," असं त्यांनी नमूद केलं.
छोट्या दुकानदारांना नुकसान
गोयल यांनी 'भारतातील रोजगार आणि ग्राहक कल्याणावर ई-कॉमर्सचा निव्वळ परिणाम' या विषयावरील अहवाल प्रसिद्ध करताना ई-कॉमर्स कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. अॅमेझॉन जेव्हा भारतात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा करते, तेव्हा आम्ही जल्लोष करतो. हे अब्जावधी डॉलर्स भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी सेवा किंवा गुंतवणुकीसाठी येत नाहीत, हे आपण विसरतो. त्या वर्षी कंपनीच्या खात्यात १ अब्ज डॉलरचा तोटा झाला होता आणि तो तोटा त्यांना भरून काढावा लागला होता, असं गोयल यांनी स्पष्ट केलं.
"अर्थव्यवस्थेत ई-कॉमर्स क्षेत्राची भूमिका आहे, पण त्यांच्या भूमिकेचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. ई-कॉमर्स कंपन्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांची उच्च मूल्याची आणि उच्च मार्जिनची उत्पादनं संपवत आहेत, तर लहान दुकानं त्यावर टिकून आहेत," असंही ते म्हणाले.
पाश्चिमात्य देशांचं उदाहरण देत ते म्हणाले की, युरोप आणि अमेरिकेनं या ट्रेंडचे परिणाम पाहिले आहेत. तंत्रज्ञान आपली भूमिका बजावेल हे मी नाकारत नाही. तंत्रज्ञान हे सबलीकरणाचे, नावीन्यपूर्णतेचे, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचं साधन आहे, पण ते पद्धतशीरपणे पुढे कसं जाईल हे पाहावे लागेल. ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांच्या बाजारपेठेत वार्षिक २७ टक्के वाटा मिळविण्याच्या शर्यतीत आम्ही भारतातील १० कोटी छोट्या किरकोळ विक्रेत्यांसाठी फार मोठे अडथळे निर्माण करू इच्छित नाही," असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.