Amazon Quick commerce : भारतीय बाजारपेठेत क्विक कॉमर्स (१० ते ३० मिनिटांत डिलिव्हरी) झपाट्याने विस्तारत आहे. त्यामुळेच ईकॉमर्स मार्केटप्लेस अॅमेझॉन इंडियानेही (Amazon India) या क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. या महिन्याच्या अखेरीस ही सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. सुरुवातीला कंपनी बेंगळुरू येथून १५ मिनिटांची डिलिव्हरी सेवा सुरू करेल. झपाट्याने वाढणाऱ्या क्विट कॉमर्स क्षेत्रात हे त्यांचे पदार्पण असेल. यापूर्वीच बाजारात ब्लिंकीट, बिग बास्केट, इन्स्टामार्ट सारख्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रात आणखी स्पर्धा वाढणार आहे.
कंपनीचे ध्येय काय आहे?
"सर्वात मोठ्या ग्राहक संख्येला जलद गतीने उत्पादने घरपोच देण्याचं आमचं ध्येय आहे. शहरी ग्राहकांना दैनंदिन वस्तूंची जलद डिलिव्हरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. येत्या डिसेंबर महिन्यापासून आम्ही बेंगळुरूमध्ये ही (१५ मिनिटांची) सेवा सुरू करणार आहोत" अशी माहिती Amazon India चे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी दिली.
ऑगस्टमध्येच सुरू होणार होती योजना
गेल्या ऑगस्टमध्ये Amazon क्विक कॉमर्समध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आली होती. मात्र, गेल्या महिन्यात कंपनीने या आराखड्यावर वेगाने काम सुरू केलं. आता ही सेवा डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होणार आहे.
जगात पहिल्यांदा भारतात सेवा
Amazon जगातील अनेक देशांमध्ये व्यवसाय करते. पण या अर्थाने भारत हा पहिला देश असेल, जिथे तो १५ मिनिटांची डिलिव्हरी सेवा सुरू करणार आहे. अग्रवाल यांनी १५ मिनिटांत कोणत्या वस्तू वितरित केल्या जातील याचा खुलासा केला नाही. त्यांनी फक्त सांगितले की कंपनी क्विक कॉमर्समध्ये १,०००-२,००० उत्पादने विकेल. ही विक्री बेंगळुरूपासून सुरू होईल आणि नंतर देशातील इतर शहरांमध्ये विस्तारली जाईल.