नवी दिल्ली - जगविख्यात ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी अॅमेझॉन इंडियाने भारतीय ग्राहकांसाठी गुडन्यूज दिली आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉन इंडियाने आजपासून हिंदी भाषेत आपला व्यवहार सुरू केला आहे. भारतातील 10 कोटी ग्राहकांना ऑनलाईन खरेदीसाठी एकत्र आणण्याचे अॅमेझॉनचे लक्ष्य आहे. त्यामुळेच, प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या एक पाऊल पुढे येत अॅमेझॉन इंडियाने हिंदी भाषेद्वारे भारतीयांना आकर्षित केले आहे.
ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन खरेदी व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अगदी, ग्रामीण भागातही मोबाईल, कपडे, भेटवस्तूंसह बहुतांश सामानांची ऑनलाईन खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळेच भाषिक अडचण दूर करण्यासाठी आणि भाषिक आत्मियता जपण्यासाठी अॅमेझॉन कंपनीने हिंदी भाषेतून आपल्या अॅप आणि साईटद्वारे ग्राहकांना सुविधा देण्यास सुरुवात केली. सध्या स्नॅपडील, पेटीएम मॉल, फ्लिपकार्ट, शॉपक्लूज या कंपन्यांचे सर्व व्यवहार इंग्रजी भाषेतूनच होतात. तर आत्तापर्यंत अॅमेझॉन इंडिया कंपनीकडूनही इंग्रजीतच व्यवहार केले जात होते. मात्र, या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या एक पाऊल पुढे जात अॅमेझॉन इंडियाने भारतीय ग्राहकांसाठी हिंदी भाषेत व्यवहार सुरू केला आहे.
अॅमेझॉन इंडियाने भारतीय ग्राहकांसाठी ही खास सुविधा सुरू केल्याचे अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. तसेच, या सुविधेमुळे भारतीय ग्राहक आपल्या राष्ट्रभाषेत वस्तूची माहिती घेऊ शकतात, त्यावरील सूट, स्पेशल ऑफर याची माहिती घेऊन आपल्या भाषेत वस्तूंची खरेदी करु शकतात. देशातील 10 कोटी नवीन ग्राहकांना ऑनलाईन खेरदीसाठी एकत्र आणण्याचे उद्देश ठेवून कंपनीने हिंदी भाषेत व्यवहार सुरू केल्याचेही तिवारी यांनी सांगितले. दरम्यान, 2021 पर्यंत भारतात इंग्रजीपेक्षा हिंदी भाषिक इंटरनेट युजर्संची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, मराठी आणि बंगाली भाषिक इंटरनेट युजर्संचीही संख्या प्रादेशिक भाषांमध्ये वाढेल, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. अमेझॉन इंडियाचे हे पाऊल ई-कॉर्मस क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.